दृष्टिहीनांना प्रकाशमय मार्ग

फिजिओथेरेपिस्ट डॉ.दिव्या यांचा प्रेरणादायी प्रवास

नेत्र रोग तज्ज्ञ डॉ.रविंद्र बिजुर आणि भूलतज्ज्ञ डॉ.सुजल बिजुर यांच्या घरी दुस-यांदा मुलीचा जन्म झाला. या बाळाच्या येण्याने बिजुर कुटुंबियांचा आनंद व्दिगुणीत झाला होता. मात्र काही दिवसांतच हे बाळ अधून मधून डोळ्यात बोटं घालत असल्याचं घरच्यांचया लक्षात आलं. वडिल नेत्ररोगतज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्या नजरेला ही बाब काहीशी खटकली. त्यांनी तातडीनं दिव्याच्या डोळ्यांची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण त्यांच्या चिमुकल्या बाळाला जन्मापासूनच दृष्टी नसल्याचे आढळून आलं. सुरूवातीला घरच्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र स्वतःला खंबीर बनवत या जोडप्याने ते कटू सत्य स्वीकारलं आणि तेवढ्याच मायेनं तिचं पालन पोषण केलं. आज ती मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे. ती मुलगी आज डॉ. दिव्या बिजुर या नावानं ओळखली जाते.

दिव्याला जन्मापासून दृष्टी नसल्याचे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्हाला खूप मोठा धक्का बसला होता. पण ते दुःख बाजूला सारत आम्ही दिव्याला नव्या विश्वाची ओळख करून देण्याचं मनोमन ठरवलं, दिव्याच्या आई डॉ. सुजल सांगत होत्या. ती अधिकाधिक स्वावलंबी होऊ शकेल यावर आम्ही तिच्या लहानपणापासूनच भर दिला. तिच्यासाठी घरात अनेक आधुनिक उपकरणे घरात आणली. त्यावेळी आमच्याकडे एक मशीन होते. त्या मशीनसमोर पेपर ठेवला की ते मशीन पेपर वाचून दाखवायचे, तिच्या जोडीला ब्रेलरही असायचा.

दिव्या लहान असताना घर हेच तिचं जग होतं. शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा आम्ही पहिल्यांदा अंध मुलांच्या शाळेचा विचार केला. मात्र ती शाळा मुंबईला, दादरला होती आणि आम्ही वसईला राहायचो. तरीही आम्ही शाळेत चौकशी केली. पण दिव्याला घेवून दररोज वसईहून दादरला येणं जाणं करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग आम्ही दिव्यासाठी वसईतच शाळेची शोधाशोध सुरू केली. जी शाळा निवडली ती सर्वसामान्य मुलांची शाळा होती. पण आम्ही तिला त्या शाळेत टाकलं आणि दिव्याचं शालेय शिक्षण सुरू झालं. या शाळेत शिकणीरी ती एकमेव अंध आणि सर्व विषयात पहिली येणारीही एकमेव मुलगी होती. देवानं दृष्टी दिली नसली तरी सरस्वतीचा वरदहस्त तिच्यावर होता.

प्रत्येक वस्तू जी आपल्याला दिसते त्या वस्तूला स्पर्श करून आम्ही ती दिव्याला दाखवली. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमध्ये काम करणा-या एम. के. चौधरी सरांनी हा मार्ग दाखवला होता. केवळ स्पर्शानेच तिला सगळं समजेल हे जेव्हा आम्हाला समजले, तेव्हापासून आम्हीही वेगवेगळे आकार तिला समजावून सांगू लागलो. तीदेखील मन लावून प्रत्येक आकार समजून घेवू लागली. तो आकार अनुभवू लागली.

अशाच अनुभवातून दिव्याचं शालेय शिक्षण झालं. शालेय शिक्षणानंतर दिव्याचं फिजीओथेरपीचं शिक्षण सुरू असताना महालक्ष्मीला जावं लागत होतं. त्यावेळी ट्रेनमधून जाताना इतर प्रवासी विचारायचे की हिला दिसत नाही का, त्यावर दिव्याच त्यांना उत्तर द्यायची की, मला दिसत नसले तरी ऐकू येते. असे अनेक अनुभव नेहमीच येत असतात. मात्र दिव्याने या सर्वांवर मात करून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले, त्यामुळे ती फिजीओथेरपिस्ट होऊ शकली. आज ती आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करू लागली आहे. अतिशय सक्षमपणे ती सर्व गोष्टी हाताळत असते. ती ज्या आत्मविश्वासाने दैनंदिन जीवनात वावरते, ते पाहून तिला दिसत नाही, हे पटकन लक्षातही येत नसल्याचं डॉ. सुजल सांगतात.

img-20170109-wa0102-1

दिव्या आज स्वावलंबी आहे. तिने स्वावलंबी बनावं यासाठी आम्ही जे प्रयत्न केले, त्याला तिनेही सकारत्मक प्रतिसाद दिला. लहानपणापासून केवळ स्पर्शानंच जगाला ओळखू शकणारी आज इतरांशी तेवढ्याच सहजतेने वागते. अर्थात यासाठी तिनेही कठोर मेहनत घेतली. तिच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल अनेक नामांकित संस्थांनी तिला गौरविले आहे. आपल्यामध्ये कोणतीच कमतरता नाही हे  साऱ्या जगाला तिने दाखवून दिले आहे. जणू एका नव्या विश्वाचीच ओळख करून दिली आहे.