चित्रकलेतूनच उद्योगाची भरारी

उज्वला भट्टे

ज्या कामातून मानसिक समाधान मिळते तेच काम आपल्याला आय़ुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतं असं मानलं जातं. हेच सूत्र उज्वला भट्टे यांच्या बाबतीत लागू पडते. चित्रकलेची आवड जोपासतानाच मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या धडपडीतून आशेचे नवे धुमारे फुटू लागले आणि त्याच धुमाऱ्यांतून उज्वलाताई आजच्या उद्योजिका बनल्या.

उज्वलाताईंना लहानपणापासून चित्रकलेची आवड. शाळेत असल्यापासून विविध रंगाच्या संगतीत त्या रमायच्या. सोबतच्या मैत्रिणींनी करियरची उंच उड्डाणे पाहिली तर त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून जगण्याची सुरूवात केली. शालेय जीवनात सुरू झालेला चित्रकलेचा प्रवास पुढच्या आयुष्यात वेगळ्या वळणावर घेवून गेला.

कांदिवलीच्या एका दिव्यांग मुलांच्या शाळेत व्होकेशनल ट्रेनर म्हणून नोकरी करत होत्या. ज्या मुलांना समाजात जगताना सर्वसाधारण मुलांपेक्षाही जास्त संघर्ष करावा अश्या गतीमंद मुलांना त्यांच्या कले कलेने घेऊन, प्रोत्साहन देऊन शिकवण्याचं आव्हान हे खूपच मोठे असते. या मुलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल, यासाठी चित्रकलेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं काम त्यांच्याकडे होतं.

मुलांमध्ये रमलेली असतानाच  काही कारणाने नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीपेक्षाही सगळ्या मुलांपासून दूर जावं लागणार, या एकाच विचारानं मला अस्वस्थ व्हायला झालं, उज्वलाताई सांगत होत्या. आयुष्याची सतरा वर्ष शिक्षकी पेक्षात घालवल्यामुळं या मुलांना सोबत घेऊनच काहीतरी करू, असा निश्चय केला आणि त्यातूनच आजची उज्वला भट्टे  उभी असल्याचं त्या अभिमानाने सांगतात.

अंगात तर कला होतीच. त्यातूनच मग विविध मार्ग सुचत गेले. सुरूवातीला दादरच्या ब्राह्मण सभेत होणा-या एका प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला. वारली चित्रकलेतून साकारलेल्या काही वस्तू आणि वॉल पेंटिंगचे प्रदर्शन त्या प्रदर्शनात मांडले. पहिल्याच प्रयत्नात चित्रांना अपेक्षेपेक्षाही चांगाला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीलाच मिळालेल्या यशानं आनंद आणि आत्मविश्वास दोन्हीही दुणावले. त्यातूनच मग हुरूप वाढला.

14560078_542377805961072_6209369631792126820_o

सुरूवातीला या मुलांना सोबत घेऊन काय करता येईल, असा प्रश्न सतावत होता. आपल्या प्रयत्नांना मुलांच्या कल्पनाशक्तीची जोड द्यायची, असा विचार त्यांनी आधीच करून ठेवला होता. म्हणजे मुलांना शिकता शिकता ही स्वावलंबनाची सवय व्हावी हा त्यामागचा विचार होता. त्यामुळे काही मूलभूत गोष्टी पुरवल्या की मुलं उत्साहाने कामाला लागतात, हे लक्षात आल्यावर मुलांकडून मोबाइल कव्हर बनवून घ्यायला सुरूवात केली. आता चार मुलं विविध आकारातले मोबाइल कव्हर शिवून देतात.

ujwala-bhatte3

नवी मुंबईतल्या अर्बन हाटमध्ये उज्वलाताईंचा स्टॉल जवळपास वर्षभर असतो. आतापर्यंत अनेक कार्यशाळाही इथे घेतल्या आहेत. अर्बन हाटचं आणि माझं एक छान नातं तयार झालं आहे. जवळपास हे माझं दुसरं घरचं आहे असंही त्या सांगतात. याचं कारण म्हणजे जसं आपल्या कल्पकतेने आपण घर सजवतो तसं या अर्बन हाटच्या सजावटीतही माझा खारीचा वाटा आहे, हे त्या कौतूकानं सांगतात. प्रवेशद्वापाशी वारली पेंटिंग केलेल्या काही मातीच्या कुंड्या, माठ मांडण्यात आले आहेत, ते उज्वालाताईंनीच रंगवलेले आहेत. इथल्या भिंतीवरही उज्वलाताईंनी काढलेली वारली चित्र आहेत.

ujwala-bhatte4

कारागृहातील महिला कैद्यांसाठीही कार्यशाळा

उज्वला ताई केवळ एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर आर्थर रोड, ठाणे तुरूंगातल्या महिला कैद्यांनाही  स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी त्या तिथेही कार्यशाळा घेऊन त्या महिलांना वारली चित्रकला शिकवतात. उज्वलाताईंच्या प्रत्येक पेंटिंगमधून एखादी गोष्ट समोर मांडली जाते. यामुळेच केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या पेंटिंगची मागणी वाढू लागली आहे.

आमच्या या प्रयत्नाला आता लोकांची साथ मिळत आहे. स्वयंसिद्धतेच्या दिशेने सुरू झालेले  हे पाऊल  अविरतपणे पुढे जात आहे. जिद्दीने सुरू केलेल्या या प्रवासात केवळ स्वतःचाच विचार न करता आपल्यासोबतच्या समुदायाचाही विकास व्हावा यासाठी सुरू केलेली ही यशस्वी वाटचाल आहे.

संपर्क

9820543964

E mail- bhatte.ujjwala@gmail.com