मुंबई मॅरेथॉन आयोजकांनी 23 लाख भरले

स्पर्धेनंतर याप्रकरणी सुनावणी घेण्याची प्रशासनाला विनंती

मुंबई, 14 जानेवारी 2017/AV News Bureau:

‘स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी 23 लाखांचा धनादेश आज मुंबई महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. महापालिका प्रशासानाने पाठवलेली 5 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा करण्याची नोटिस मान्य नसल्याचे सांगत याप्रकरणी स्पर्धेनंतर सुनावणी घ्यावी, अशी विनंती आयोजकांनी केल्याची माहिती महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त  किरण दिघावकर यांनी दिली.

उद्याच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जाहिरात फलक लावण्यासह लेजर शो देखील आयोजित केला जाणार आहे. मात्र या जाहिराती आणि लेजर शोसाठी  जाहिरात शुल्क, भू – वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव याकरिता आयोजकांनी 24 तासांत महपालिकेकडे ५ कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ एवढी रक्कम जमा करावी, अशी नोटीस महापालिकेच्या ए विभागातर्फे मॅरेथॉन आयोजकांना पाठविण्यात आली होती.

याबाबत आयोजकांनी  महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. या स्पर्धेसाठी गेल्यावर्षीप्रमाणेच शुल्क आकारावे असे स्पष्ट करीत 23 लाखांचा धनादेश  पालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. तसेच जाहिरात शुल्क, भू – वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव यासाठी मागितलेली 5 कोटींपेक्षा अधिक शुल्क मान्य नसल्याचे स्पष्ट करीत याप्रकरणी स्पर्धेनंतर सुनावणी घेवून आम्हाला बाजू मांडण्याची संधी द्यावी,अशी विनंती आयोजकांनी केल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.

मॅरेथॉन स्पर्धा आयोजनाचे समन्वयक अरविंद रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  महापालिका प्रशासनाकडे 23 लाख रुपये भरल्याचे सांगितले. मॅरेथॉन स्पर्धेला खूपच कमी वेळ राहिला असून स्पर्धेनंतर याबाबत पालिका प्रशासनाशी सविस्तर चर्चा करू, असे सांगत रविवारची मॅरेथॉन होणार असल्याचेही स्पष्ट केले.