विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय भावना व एकात्मता टिकवावी

 न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली एसएनडीटीचा दीक्षांत समारंभ  

मुंबई, 20 जानेवारी 2017/ AV News Bureau:

महिलांच्या सक्षमीकरणासाठी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले विद्यापीठ हे विश्वविद्यालय आहे. या विश्वरुपी विद्यालयातून शिक्षकांनी जात, धर्म भेदभाव न ठेवता राष्ट्रीय भावना व एकात्मता जोपासण्याचे कार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधिश चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आज एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 66 व्या दीक्षांत समारंभप्रसंगी केले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सर सिताराम तथा लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह, चर्चगेट येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु  शशिकला वंजारी,  प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु श्रीमती वंजारी यांनी विद्यापीठाचा दीक्षांत अहवाल सादर केला. अहमदाबाद येथील डॉ.अरुणा वणीकर यांना त्यांच्या ‘रेनल आणि ट्रान्सप्लांट पॅथोलॉजी’ या क्षेत्रातील  भरीव कामगिरीबद्दल ‘डी. लीट’ ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच विद्यापीठातील 11 हजार 844 विद्यार्थीनींना पदवी व पदवीका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये पदव्युत्तर व पीएचडी या पदव्यांचाही समावेश असून एकुण 47विद्यार्थींनींना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या देशात स्त्रियांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी या विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थींनींनी आपल्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या हितासाठी करावा. शिक्षणातून महिला सक्षमीकरण करणे हे या विद्यापीठाचे ध्येय आहे. या विद्यापीठाने महिला शिक्षण व सक्षमीकरणाची 100 वर्षे पूर्ण केली आहेत, असे शशिकला वंजारी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रथमच मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट विथ पोर्ट्रेचर, बॅचलर ऑफ कॉमर्स विथ अकौन्टन्सी अँड फायनान्स, बॅचलर ॲड मास्टर ऑफ स्पेशल एज्युकेशन इन मेंटल रिटार्डेशन अँड इन्टेलेक्च्युअल डिसेबिलीटी आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी विथ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग या पदव्या देण्यात आल्या.