समाजाचे देणं लागतो, या जाणिवेतून काम करतो

बा. कृ. क्षिरसागर

नेरुळ, नवी मुंबई /

लहानपणापासून घेतलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळाले. मनमिळावू पत्नी, सुसंस्कारीत  आणि उच्च शिक्षण घेतलेली मुलं असा आमचा संसार आहे. 30 वर्षे महापालिकेत नोकरी केल्यानंतर निवृत्त झालो. आज सारं काही मनासारखं चालले आहे. नेरूळ  48 येथील सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अध्यक्ष म्हणूनही काम पाहतो. रोज नवे सवंगडी भेटतात. त्यांच्यासोबत वावरताना इतरांची सुख-दुःख आम्ही वाटून घेतो. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि समाजासाठीही काहीतरी देणं लागतो, या जाणिवेतून  शक्य होईल, तेवढी इतरांना मदत करतो आणि आनंदी राहतो.

बालपण 

 प्रत्येकाच्या जीवनात लहानपणापासून संघर्ष असतो, तसा माझ्यादेखील वाट्याला आला. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. आजोळी साखराळे या गावात 1941 साली जन्म झाला. माझ्या जन्मासाठी आईवडिलांनी व्रतवैकल्ये, पुजा अर्चा केल्या. आईवडिलांच्या लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनी माझा जन्म झाला. त्यामुळे मी घरच्यांचा लाडका होतो. सांगलीच्या पळुस तालुक्यातील तुपारी गावात बालपण गेले.

आमच्या गावात 4 थी पर्यंतची शाळा होती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी मला ताकारी या शेजारच्या गावात जावे लागले. सकाळी शाळेला जायचो आणि शाळा सुटल्यावर संध्याकाळी घरी यायचो. ही पायपीट रोजची होती. सहावी आणि सातवीपर्यंतचे शिक्षण ताकारी येथेच झाले. मात्र पुढील शिक्षणासाठी मला पुन्हा कुंडल या दुसऱ्या गावी जावे लागले. शिकायची जिद्द होती. त्यामुळे शिकण्यासाठी जिथे जावे लागेल तिथे गेलो. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे शिकून सवरून मोठं व्हायचं आणि घरच्यांसाठी काही तरी करायचं ही जिद्द त्यावेळी मनात होती. त्यामुळे दोन चार मैल रोज जायचं आणि यायचं याचं विशेष काही वाटत नव्हत. घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. माझी शिक्षणाची ओढ पाहून घरच्यांनी मला बोर्डिंगमध्ये घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 9 मैलावरील इस्लामपूर येथील बोर्डिंगमध्ये जावू लागलो. घराकडून अधिक मदत मिळण्याची अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे शाळेत जे काही शिकवायचे ते बारकाईने लक्ष देवून ऐकू लागलो आणि मग मित्रांच्या पुस्तकातून सराव करायचो. मित्रांनीदेखील आपली पुस्तके अभ्यासाला दिली. अशाप्रकारे मजल दरमजल करीत मी माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

आता माझ्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरूवात होणार होती. शिक्षण पूर्ण झाल्यामुळं मुलाने नोकरी करावी अशी वडिलधाऱ्यांच्या इच्छा होती. त्यानुसार काकांनी मला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. मी मुंबईला जाणार हे ऐकून आई रडायला लागली. माझा मुलगा साता समुद्रापार जाणार म्हणून तिचा काहीसा विरोध होता. मात्र मी तिला समजावले. मी आधी जातो कामधंदा सुरू झाला की, तुम्हा साऱ्यांना बोलावून घेतो, असे सांगून मी मुंबईला आलो.

मुंबईत आगमन

गावाकडून थेट मुंबईसारख्या शहरात आल्यामुळे थोडा बावरलो. मात्र आता मागे फिरायचे नाही कि घाबरायचे नाही. जिथे नोकरी मिळेल तिथे काम करायचे असे ठरवले होते. त्यानुसार सुरुवातील रेमंड कंपनीत कामाला लागलो. काही काळ तिथे नोकरी केली. त्यानंतर महापालिकेत क्लार्कची नोकरी मिळाली. सुरुवातीचे तीन महिने भायखळा येथील कार्यालयात काम केले. त्यानंतर चेंबूर येथील कार्यालयात आलो. कामावर स्थिर झाल्यावर आईवडील मुंबईला आले आणि आम्ही सारेजण घाटकोपर येथे राहू लागलो.

नोकरीत स्थिरावल्यामुळे घरचे लग्नासाठी विचारू लागले. 1965 मध्ये माझे लग्न झाले. माझी पत्नी आशालता हिने घरातील साऱ्यांना आपलेसे केले. आमची वाटचाल सुखाने सुरू झाली. आमची पाच मुले. तीन मुलगे आणि दोन मुली. त्यांच्या  शिक्षण आणि पालनपोषणाकडे पत्नीने अधिक लक्ष दिले. त्यामुळे मी नोकरीवर लक्ष केंद्रित करू शकलो.

आम्ही गरीबीत शिकलो आणि गावाकडे शिकलो. मात्र आमच्या मुलांना सोयी सुविधा मिळाल्या. मुलांनीदेखील त्या सुविधांचा चांगला उपयोग करून घेतला. आज मोठा मुलगा गावाकडेच स्थिरावला आहे. दुसरा मुलगा एमडी, रेडिओलॉजिस्ट आहे. त्याची बायकोदेखील डॉक्टर असून कोकणातील आहे. तिसरा मुलगा इंजिनिअर असून खासगी कंपनीत कामाला आहे. तर दोन्ही मुलींनी शिक्षकी पेशा स्वीकारला असून नेरूळ येथील डीएव्ही शाळेत शिकवतात. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आता समाजासाठीही काहीतरी देणं लागतो, या जाणिवेतून  शक्य होईल, तेवढी इतरांना मदत करतो आणि आनंदी राहतो.

संपर्क –

बा.कृ.क्षीरसागर

ई 20/03 ,सुर्योदय सोसायटी, सेक्टर -48,

नेरूळ, नवी मुंबई.

संपर्क – 9987091132