युतीने मागील वाचननाम्यातील एकही घोषणा पूर्ण केली नाही

 मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची शिवसेना-भाजपवर टीका

मुंबई, २० जानेवारी २०१७ :

२०१२ च्या महानगर पालिकेच्या निवडणुकीतील शिवसेना भाजपच्या वचननाम्यातील एक ही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. ते पूर्ण अपयशी ठरल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

या पत्रकार परिषदेला  मनपा विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा, माजी आमदार चरणसिग सप्रा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर उपस्थित होते.

युतीच्या वचननाम्यात त्यांनी मुंबईकरांना मुबलक व शुध्द पाणी देण्याची घोषणा केली होती. गारगाई व पिंजाळ या प्रकल्पातून अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा केली. परंतु वास्तविक पाच वर्ष गेली तरी अजून काहीही झालेले नाही. अजून साधा फिजिकल रिपोर्ट हि त्यांनी तयार केलेला नाही. रुग्णांसाठी हेल्थ कार्ड देणार होते, पण  अजून कोणालाही काहीच दिलेले नाही. उलट मुंबईतील आरोग्य व्यवस्था खूपच बिकट व वाईट झालेली आहे. मराठी शाळांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली. परंतु मुंबईतील मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ३६ शाळा बंद पडल्या आणि ४०००० विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहेत.  याशिवाय इतर अनेक आश्वासने कागदावरच राहिल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

मुंबईतील ५०० क्षेत्रफळ पर्यंत घरे असणाऱ्यांना मालमत्ता कर माफ करणार, असे शिवसेनेने काल जे जाहीर केले. परंतु ही काँग्रेसचीच जुनी मागणी आहे. आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतानाच आम्ही ही मागणी केली होती. आमच्याच मागणीची घोषणा शिवसेना आता पुन्हा करते आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला आहे.