झोपडपट्टीवासीयांचा सिडकोवर धडक मोर्चा

पुनर्वसन करण्याची  रिपब्लिकन सेनेची मागणी

नवी मुंबई,ता.21 जानेवारी 2017AV News Breau:

नवी मुंबईत सिडको आणि महापालिकेने झोपड्या आणि चाळींवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या झोपडपट्टीवासियांनी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली नुकताच सिडकोवर धडक मोर्चा काढला. ही कारवाई थांबवावी आणि पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांना देण्यात आले.

सिडकोने तळवली गावातील चाळींमध्ये कारवाई करत ही घरे अतिक्रमण विभागामार्फत पाडली. यावेळी पोलिस बळाचा वापर करत महिला आणि मुलांनाही बाहेर काढले. अनेक वर्षापासून या जागेवर राहणा-या रहिवाशांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. 2007 च्या सुमारास घरे बांधण्यात आली तेव्हा सिडकोच्या अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता मात्र सिडको या घरांवर कारवाई करत आहे. ही कारवाई थांबवावी आणि या कारवाईत बेघर झालेल्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत. अशी मागणी सिडकोकडे करण्यात आल्याचे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष खाजामिया पटेल यांनी सांगितले.