मुंबई निवडणुकीसाठी 2718 उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई, 4 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आतापर्यंत 2718 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबतची माहिती शुक्रवारी रात्री जाहीर केली.

मुंबई महापालिका निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज भरण्यासाठीचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरायचा होता. त्यानुसार 227 प्रभागांसाठी 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन भरता यावेत यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष वेबसाइट तयार केली आहे. तसेच निवडणुकीसाठी 23 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.