ठाण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती

vote jagruti

ठाणे, 4 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नागरिकांनी मोठया प्रमाणावर आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे.

ठाणे शहरात ‘भिंती रंगवा’,’चित्रफिती, होर्डिंग्ज,  पथनाट्ये,  चित्ररथ,  महाविद्यालये  अशा  विविध  माध्यमातून  मतदानाचे  महत्व नागरिकांना पटवून  दिले  जात आहे. “भिंती रंगवा ठाणे सजवा ”  ही संकल्पना राबविण्यात येत असून या संकल्पनेला नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. निवडणूक जनजागृतीसाठी भिंतीवर ‘मतदान करा’ तसेच ‘लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करुया’ चे संदेश ठाणेकरांना देण्यात आले आहेत.  ध्वनीफित व चित्रफितीच्या माध्यमातून कोणत्याही कारणांना बळी न करता आपले अमूल्य मत वाया घालवू नका अशी जनजागृती केली जात आहे. या ध्वनीफिती शहरातील सर्व सिनेमागृह, मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे शहरातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांची बैठक घेवून शिक्षकांनी विद्यार्थ्याना मतदानाचे महत्व पटवून देवून विद्यार्थ्यानी पालकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असा संदेश देण्यात आला आहे.

  • युवा पिढीला जिंगलच्या माध्यमातून साद

पहिल्यांदाच मतदान करणा-या युवापिढीनीही मतदानाचा अधिकार बजावावा याकरिता -युवापिढीसाठी एफ.एम.मिरचीवर ‘जिंगल’च्यामाध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. शहरातील सर्व मॉल्स, मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे आदी सर्व ठिकाणी मतदान जनजागृतीच्या ध्वनीफित प्रसिध्दकेल्या जात आहे. त्याचप्रमाणे बँका, उपनिबंधक कार्यालये, सहकारी संस्था तसेच महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये, महाविद्यालये येथेहीजाहिराती व पथनाट्याच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.