भररस्त्यात एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

नवी मुंबईतही रिक्षा चालकांची दादागिरी

नवी मुंबई, 10 जून 2017/AV News Bureau:

ठाण्यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करण्याची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतही रिक्षा चालकांची दादागिरी समोर आली आहे. भर रस्त्यात एनएनएमटी बसच्या गाड्या थांबवून रिक्षा चालकांच्या गटाने ड्रायव्हर आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. रिक्षा चालकांनी केलेल्या बेदम मारहाणीत बस कर्मचाऱ्याच्या नाकाचे हाड तुटले आहे. दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रिक्षा चालकांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नाक्या नाक्यावर रिक्षा उभ्या असतात. अस्ताव्यस्तपणे उभ्या असणाऱ्या या रिक्षांमुळे बस तसेच इतर वाहनांना वळण्यास अडचण होत असते. त्यामुळे अनेकदा वाद होतात. तसाच प्रकार काल सायंकाळी घणसोली सेक्टर 5 मधील हावरे चौकात घडला. रस्त्यावरच बेदरकारपणे उभ्या केलेल्या रिक्षांमुळे बसला (20 क्रमांकाची बस) (बस क्रमांक MH43BG2462) जाण्यास अडचण होत होती. त्यामुळे एनएमएमटीच्या बसचालकाने हॉर्न वाजवून रिक्षा चालकांना गाडी पुढे घेण्याची विनंती केली. मात्र गाडी पुढे न करता बस चालकाशी रिक्षाचालक वाद घालू लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाद घालत रिक्षा चालकांनी बसच्या चालक आणि वाहकाला गाडीबाहेर बोलावले. वीट तसेच सायकल फेकून बेदम मारहाण केल्याचा प्रकार नागरिकांनीच मोबाइलवर केलेल्या व्हिडिओ शूटमध्ये दिसून आले आहे. वीट आणि सायकल फेकून मारल्यामुळे तसेच बेदम मारहाण केल्यामुळे एका एनएमएमटी कर्मचाऱ्याच्या नाकाचे हाड मोडल्याची माहिती एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. व्हिडिओ शूटिंग करणा-या युवकालाही एका कारचालकाने चालकांनी मारहाण केल्याचा प्रकारही समोर आला आहे.

याप्रकरणी एनएमएमटीचा बस चालक फैय्याज आजीम पठाण यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तीन रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल केला असून किरण, राजू आठवले आणि दादा नार्डेकर (सर्व राहणारे कोपरखैरणे) या रिक्षा चालकांना अटक केल्याची माहिती नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

दरम्यान, रिक्षाचालकांकडून एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा नागरिकांनी काढलेला व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे याप्रकरणात कारवाई करण्यास मदत झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.