शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील विजयी

BALARAM PATIL

 नवी मुंबई ७ फेब्रुवारी २०१७/AV News Bureau:

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांना सर्वाधिक ११ हजार ८३७ मते पडली. त्याखालोखाल ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांना ६ हजार ८८७ मते पडली. आज पहाटे निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला. वाशीच्या सेक्रेड हार्ट हायस्कूलमध्ये ही मतमोजणी करण्यात आली.

या निवडणुकीसाठी १० उमेदवार रिंगणात होते. तर निवडणुकीसाठी ३१ हजार ९५१ मतदान झाले होते. हे मतदान पसंतीक्रमानुसार होते म्हणजे मतदाराने मतपत्रिकेतील प्रत्येक उमेदवारास एक ते दहा असा आकड्यात पसंतीक्रम द्यायचा होता. नोटाचा पर्याय देखील होता.

  • एकूण उमेदवार

ज्ञानेश्वर म्हात्रे,अशोक बेलसरे,कडू विश्वनाथ, केदार जोशी, नरसू पाटील,बहिराव फकीरराव, बाळाराम पाटील,महादेव सुळे, मिलिंद कांबळे, मोते रामनाथ हे १० उमेदवार होते.

  • मतमोजणीचा पहिला टप्पा

मतमोजणीसाठी ३० हजार ७९६ मतपत्रिका घेण्यात आल्या. तर ११५५ अवैध मतपत्रिका ( नोटा सह) बाजूला काढण्यात आल्या. या मतांपैकी ज्या उमेदवारास अर्धी तसेच वरचे एक अशी पहिल्या पसंतीची १५ हजार ३९९ मते पडतील तो विजयी घोषित केला जाईल असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मते मोजण्यात आली तेव्हा बाळाराम पाटील यांना ९ हजार ३२७, ज्ञानेश्वर म्हात्रे याना ५ हजार २१५, रामनाथ मोते यांना ५ हजार १८४ तर अशोक बेलसरे यांना ४ हजार ६८ मते मिळाली.

  • पहिल्या फेरीत १५ हजार ३९९ चा कोटा कोणताच उमेदवार पूर्ण करू न शकल्याने बाद फेरी सुरुवात करण्याचा निर्णय झाला. यामध्ये सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांची मते इतर उमेदवारांमध्ये विभागून असे कमी मते मिळालेले उमेदवार टप्प्याटप्प्याने बाद करण्याची प्रक्रिया सुरु झाली. बाळाराम पाटील यांना सहाव्या फेरीअखेर १० हजार ७१, सातव्या फेरीअखेरीस १० हजार ५११, आठव्या फेरीअखेर १० हजार ९९८ आणि नवव्या फेरीअखेरीस ११ हजार ८३७ इतकी मते मिळाली.  तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सहाव्या फेरीत ५ हजार ७६९, सातव्या फेरीत ६ हजार २१९, आठव्या फेरीत ६ हजार ८८७ मते मिळाली. रामनाथ मोते यांना सहाव्या फेरीत ५ हजार ६२३, सातव्या फेरीत ५ हजार ९८८ मते मिळाली तर अशोक बेलसरे यांना सहाव्या फेरीत ४ हजार ५३३ मते मिळाली.

कोणत्याही उमेदवाराला कोटा पूर्ण न करता आल्याने सर्वाधिक मते मिळालेल्या बाळाराम पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. तत्पूर्वी दिल्ली येथे भारत निवडणूक आयोगाला तसा ईमेल पाठवून त्यांची मान्यता घेतल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी निर्णय जाहीर केला व विजयी उमेदवार बाळाराम पाटील यांना तसे प्रमाणपत्र सुपूर्द केले.