दिवा–पनवेल रेल्वे मार्गावर भिषण अपघात टळला

रेल्वे रुळांमध्ये पडलेला लोखंडी तुकडा गाडीखाली आला

मोटरमनच्या प्रसंगावधानाने हजारो प्रवासी वाचले

नवी मुंबई, 7 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

 दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर मोटारमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुणे-संत्रागाची एक्सप्रेसला होणारा भिषण अपघात टळला आणि एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. नेवडे फाटा परिसरात रेल्वेमार्गावरील दाेन रूळांमध्ये लांब लोखंडी तुकडा आढळून आला.ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरून 02821 ही पुणे-सात्रांगाची एक्सप्रेस सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास जात होती. ही एक्सप्रेस नेवडे फाटा परिसरात आली असता एक्सप्रेसचे मोटरमन पाटील यांना गाडीखाली जड वस्तू अडकल्याचे आढळून आले. मोठ्याने आवाज येऊ लागल्यामुळे पाटील यांनी तातडीने गाडी थांबवली आणि गाडीखाली उतरून पाहिले असता दोन रेल्वे रुळांच्या मध्ये लांबलचक लोखंडी रुळाचा तुकडा पडल्याचे आढळून आले. इंजिनच्या पुढील बाजूस तो तुकडा अडकल्यामुळे आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मोटरमन पाटील, लोको पायलट सहाय्यक राजकुमार आणि गार्ड विल्यम्स यांनी तातडीने रेल्वे अधिकारी आणि पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती नवी मुंबई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने आणि इतर अधिकारी, कर्मचारी तातडीने घटना स्थळी पोहोचले, तेव्हा रेल्वे मार्गालगतही अनेक लोखंडी तुकडे पडल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्यांनी रेल्वे मार्गावर पडलेला लोखंडी तुकडा बाजूला केल्यानंतर एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे माने यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जनशताब्दी एक्सप्रेसच्या मार्गावरही अशाप्रकारे लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आला होता. मात्र मोटरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे मोठा अपघात टळला होता. ही घटना अजून ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार उघडकीस आल्यामुळे रेल्वे मार्गांच्या आणि त्यावरून धावणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.