रसायनी,खालापुर पोलीस ठाणी वर्ग करण्याला वेग

रायगड उपअधिक्षकांनी  गावे आणि क्षेत्रफळाची माहिती मागविली 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात लवकरच होणार समावेश

नवी मुंबई,14 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

रायगड जिल्ह्यातील खालापुर आणि रसायनी पोलीस ठाण्यांचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रायगड पोलीस उपअधिक्षकांनी सोमवारी दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गावांची आणि क्षेत्रफळांची विस्तृत माहिती मागविली आहे.

नवी मुंबई शहर आणि आजुबाजूच्या प्रदेशात अनेक नवीन प्रकल्प उभे राहत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सेझ, जेएनपीटीचे चौथे बंदर, सागरी सी लिंक, कोस्टर रोड आणि इतर मोठ्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची कार्यकक्षा आणखी विस्तारीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याअंतर्गत खालापूर व रसायनी या दोन तालुक्यांतील पोलीस ठाणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कक्षेत येणार आहेत. त्याअनुषंगाने हालचालींनाही वेग आला आहे.

रायगड अधीक्षक कार्यालयाने यार्श्वभूमीवर खालापुर आणि रसायनी पोलीस ठाण्यांशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये खालापुर आणि रसायनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणारी एकूण गावे, त्यांची यादी तालुका आणि पोलीस ठाणे वर्गवारीसह सविस्तर माहिती मागविली आहे. त्याशिवाय खालापुर आणि रसायनी पोलीस ठाण्यांचे एकूण क्षेत्रफळ आदींचीही सविस्तर माहिती मागविली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.