बेलारपूरमधून मंदा म्हात्रे तर ऐरोलीतून संदीप नाईक

  • नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जाहीर

  • गणेश नाईक, विजय नाहटा यांची नावे पहिल्या यादीतून गायब

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १ ऑक्टोबर २०१९ 

नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. विद्यमान आ. मंदा म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप डेरेदाखल झालेले गणेश नाईक आणि शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्यातील चुरस अखेर संपली आहे. भाजपच्या पहील्या यादीत जाहीर केल्याप्रमाणे आ. मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक आणि विजय नहाटा यांना मागे सारत बेलापूरची उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांची बाजू वरचढ झाली आहे. ऐरोली विधान सभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे संदीप नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपची दुसरी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीद्वारे गणेश नाईक यांना एखादा मतदारसंघ मिळेल का, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. मात्र नवी मुंबईतील दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर झाल्यामुळे सदर उमेदवार आणि त्या उमेदवारांसाठीची मोर्चेबांधणी कशी असणार याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांना तिकीट मिळेल, अशीच हवा सुरू होती. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक भाजप नेते आणि शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी पसरली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तर भाजपचा प्रचार न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तर गणेश नाईक आणि संदीप नाईक यांना मदत करायची की नाही, याबाबत खुद्द भाजपचे स्थानिक कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परंतु आता मंदा म्हात्रे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे  या संधीचे त्या कसा फायदा उठवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांनीच जागा वाटपात बेलापूरची जागा मंदा म्हात्रे यांना दिली आहे. मंदा म्हात्रे यांनी गेल्या निवडणुकीत गणेश नाईक आणि विजय नाहटा यांचा पराभव केला होता. त्यामुळे म्हात्रे यांनी या मतदारसंघावर आपलाच हक्क असल्याचे जाहीर केले होते. परंतु गणेश नाईक यांनी आपल्यासोबत राष्ट्रवादीतील २ नगरसेवक सोडून इतरांना भाजपमध्ये नेले. त्यामुळे नवी मुंबईत भाजप बळकट झाली असा दावा करण्यात येत आहे. परंतु गेल्या निवडणुकीतही हीच ताकद गणेश नाईकांसोबत होती. तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तर गेले वर्षभर जोरदार करणाऱ्या नाहटा यांच्या पदरीही निराशा पडली आहे. त्यामुळे आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात, हे पाहणे आवश्यक आहे.

आता बेलापूर मतदार संघातील युतीचा उमेदवार निश्चित झाल्यामुळे गणेश नाईक तसेच विजय नहाटा या दोघांना मंदा म्हात्रे यांच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र निवडणुकीत मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निकाल गेला तर त्याचे  खापर या दोन नेत्यांवर फोडले जाईल, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. त्यामुळे मंदा म्हात्रे यांचा विजय पक्षासाठी आवश्यक असल्यामुळे या दोघांना नाईलाजाने का होईना, युतीचे हीत पाहून काम करावे लागणार आहे, असे बोलले जात आहे.

 

  • भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर

 

 

दरम्यान, भाजपची अद्याप दुसरी यादी जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत, त्यांना दुसऱ्या यादीत संधी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे.

==================================================

इतर बातम्यांचाही मागोवा