लाचप्रकरणी सिडको अधिकाऱ्याविरोधात गुन्हा

नवी मुंबई,ता 2 मार्च 2017/AV News Bureau:

इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी 4 लाखांच्या लाचप्रकरणी रायगड भवन येथील सिडको कार्यालयातील सहयोगी नियोजनकार आणि एका आर्किटेक्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडले.

फिर्यादी यांची उलवे सेक्टर 19 मधील प्लॉट क्रमांक 128 येथे इमारत आहे. या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यासाठी सिडको कार्यालयातील सहयोगी नियोजनकार जगदीश भास्कर पाटील (37) यांनी आर्किटेक्ट हेमंत पांडुरंग ढवळे यांच्या मदतीने फिर्यादीकडे 4 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे आज सीबीडी सेक्टर 11 मधील गौरी कॉम्प्लेक्स येथील एका कार्यालयात सापळा रचण्यात आला. तेथे हेमंत पांडुरंग ढवळे याने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी सिडकोचा सहयोगी नियोजनकार जगदीश भास्कर पाटील आणि आर्किटेक्ट हेमंत पांडुरंग ढवळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधिक्षक भागवत सोनेवणे यांनी दिली.