आण्णासाहेब जगताप कुस्ती स्पर्धेचा विजेता

नवी मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धा

 नवी मुंबई,6 मार्च 2017/ AV News Bureau:

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा आण्णासाहेब जगताप या कुस्तीगीराने सोलापूरच्या गणेश जगताप या कुस्तीगीराशी झालेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत मात करीत 1 लाख रूपये रक्कमेसह महापौर चषकाचा मानाचा पट्टा व चांदीची गदा पटकाविली. दत्ता नरळे हा सोलापुरचा पैलवान तिस-या तसेच सांगलीचा रणजित पवार हा पैलवान चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. व्दितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकांना अनुक्रमे 50 हजार, 25 हजार, 15 हजार इतक्या रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा तालिम संघाच्या सहकार्याने

ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय 18 वर्षाखालील कुमार गटाच्या अंतिम लढतीत पैलवान भोलानाथ साळवी याने अजय भोईर याच्यावर मात करीत 15 हजार रुपये व महापौर कुमार गटातील चांदीच्या गदेचा मान मिळविला. विकास पिसाळ आणि दर्शन पाटील हे कुस्तीगीर अनुक्रमे तिस-या व चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. 280 हून अधिक कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी झाले होते.

सध्या महिलांमध्येही असलेले कुस्ती खेळाचे आकर्षण लक्षात घेऊन महिलांकरीता ठाणे व रायगड जिल्हास्तरीय विशेष गट खेळविण्यात आला. त्यामध्ये मनाली जाधव हिने भाग्यश्री भोईर हिच्यावर मात करीत महिलांमध्ये विजेतेपद पटकाविले. ममता राठोड हिने तृतीय तसेच मोनिका चिकणे हिने चतुर्थ क्रमांक संपादन केला.

  • नवी मुंबई परिसर मर्यादित 55 ते 65 किलो वजनीगटात राहुल जाधव हा कुस्तीगीर विजयी ठरला. तसेच विकास कदम हा कुस्तीगीर उपविजेता ठरला. सुधीर पाटील यांनी या गटाचे तृतीय तसेच नानासाहेब होनमाने यांनी या गटाचे चतुर्थ पारितोषिक मिळविले.
  • नवी मुंबई परिसर मर्यादित 45 ते 50 किलो 17 वर्षाखालील वजनी गटात शरद साठे याने चेतन मालपुरे यांच्यावर मात करीत विजेतेपद पटकाविले. या गटात दिपक मालपोटे तृतीय तसेच यश पाटील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.
  • ठाणे व रायगड जिल्हास्तरीय 61 ते 70 किलो वजनीगटात लखन म्हात्रे यांनी विजय म्हात्रे यांच्यावर मात करीत विजेतेपद संपादन केले. मंगेश पाटील व भरत हरगुले अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.
  • ठाणे व रायगड जिल्हास्तरीय 45 ते 50 किलो वजनीगटात दर्शन पाटील यांनी अनिकेत मढवी यांच्यावर मात करीत विजेतेपद संपादन केले. विवेक भंडारी हे या गटात तृतीय तसेच चेतन चव्हाण चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.
  • 65 ते 74 किलो राज्यस्तरीय खुला गट यामध्ये सांगलीच्या प्रकाश कोळेकर यांनी नवी मुंबईच्या नितीन संकपाळ यांच्यावर अटीतटीच्या झुंजीत मात करून 15 हजार रुपयांसह या गटाचा चषक पटकाविला. कोल्हापूरचा पैलवान विजय पाटील या गटात तृतीय तसेच नाशिकचा पैलवान विजय सुरडे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.