कबड्डी : जय ब्राह्मणदेव, जयभारत उपांत्य फेरीत

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 10 मे 2018:

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या उपांत्यपूर्व फेरांच्या थरारक सामन्यात जय ब्राह्मणदेव आणि जयभारत या संघांनी जय मिळवून वरळी स्पोर्टस् क्लबच्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. याशिवाय भवानीमाता, पंचगंगा या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघांची धुळधाण उडवत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला.

 

वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानात सुरू असलेल्या कबड्डीच्या द्वितीय श्रेणी चकमकीत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रंगतदार लढती पाहायला मिळाल्या. आजही क्रिकेटच्या मैदानात कबड्डीच्या दर्दींची खूप मोठी गर्दी झाली होती आणि साऱ्यांनाच कबड्डीचा दम पाहायला मिळाला. उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना मध्यंतरापर्यंत एकतर्फीच वाटत होता. ब्राह्मणदेवच्या साईनाथ मोहितेने एकाच चढाईत चार गडी बाद पेले आणि साई के दिवानेवर पहिला लोण चढवायला फार वेळ घेतला नाही. त्याला देवराज गावंडच्या पकडींची सुरेख साथ लाभल्यामुळे मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा जय ब्राह्मणदेवने 18-8 अशी निर्णायक आघाडी घेतली होती. पण साई के दिवानेच्या चेतन तोंडवळकरने अनपेक्षितपणे चढाईत तीन गुण टिपत ब्राह्मणदेवच्या रक्षकांना भेदले. त्या 3 गुणांचा लाभ उठवत ब्राह्मणदेववर लोण चढवत दिवानेने 16-19 अशी सामन्यात रंगत आणली. अवघ्या पाच मिनीटांत दिवानेच्या दिवान्यांनी जबरदस्त चढाया करीत दुसरा लोणही चढवला आणि पिछाडीवरून 26-24 अशी धक्कादायक आघाडी घेतली. चेतनला पुंदन तोंडवळकरचीही मोलाची साथ लाभल्यामुळे साई के दिवानेने सामन्याचे सारे रूपच पालटवले.

 

शेवटच्या दोन मिनीटात सामन्यात कडवा संघर्ष पाहायला मिळाला. ब्राह्मणदेवच्या साईनाथने आपल्या यशस्वी चढाया आणि बोनसच्या जोरावर संघाला 27-27 अशी बरोबरी साधली. सामन्याच्या शेवटच्या मिनीटाचा खेळ सुरू होता. विजयाची संधी दोघांना समान होती. सामन्याची शेवटची चढाई चेतनला मिळते, पण एक गुण घेऊन संघाला विजय मिळवून देण्याचे त्याचे प्रयत्न जय ब्राह्मणदेवचे रक्षक त्याला लॉबीबाहेर फेकून हाणून पाडतात. जय ब्राह्मणदेवने 28-27 अशा एका गुणाच्या फरकाने हरणारा सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली.

 

दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरूवाती पासूनच काँटे की टक्कर सारखा झाला. आकाश चव्हाण आणि तेजस मोरे यांनी काही चांगल्या चढाया करून जयभारत संघाला आघाडीवर ठेवले होते. मातृभूमीकडून गौरव गावडे आणि अंकित चाळकेने यशस्वी चांगल्या चढाया करीत जयभारतच्या गुणांवर अंकुश लावले. मध्यंतरानंतर सामना पूर्णपणे जयभारतच्या मिठीत सामवला होता. चेतन परब आणि मनीष दळवीच्या चढायांनी जयभारतला 38-27 असे निर्विवादपणे आघाडीवर ठेवले होते. सामना संपायला अवघी 2 मिनीटे असताना अंकित चाळकेने बाद केलेले 4 गडींनी सामन्यचा पूर्ण नूरच पालटवला. 38-27 वरून गुणफलक 38-31 वर पोहोचतो आणि त्यानंतर मैदानात असलेल्या दोघांना झटापटीत बाद करून जयभारतवर लोण लादण्यात मातृभूमीला यश मिळते. 11 गुणांनी पिछाडीवर असलेला मातृभूमी जयभारतला 38-37 असा एका गुणाने खिंडीत गाठतो. मग आकाश चव्हाणच्या सामन्यातील शेवटच्या चढाई कडे सर्वांचे लक्ष वेधले जाते आणि आकाश आपल्या त्या चढाईत मातृभूमीचे दोन खेळाडू बाद करतो आणि 40-37 अशा फरकाने विजयाची माळ गळ्यात घालतो.

 

अन्य दोन्ही सामने फारसे रंगलेच नाही. पंचगंगा सेवा मंडळाने 13-12 अशा नाममात्र आघाडीनंतर मध्यंतराच्या वेगवान खेळाच्या जोरावर अमर सुभाष क्रीडा मंडळावर 32-23 असा विजय मिळविला तर भवानीमाताने सुशांत धाडवेच्या अफलातून चढायांमुळे दिलखूश संघावर 4 लोण चढवत 41-7 अशी मात केली.

 

उपांत्यपूर्व सामन्यांचे निकाल

  • जय ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ ( 18 आणि 10) विजयी वि. साई के दिवाने (8 आणि 19)
  • जयभारत सेवा मंडळ (19 आणि 21) विजयी वि. मातृभूमी क्रीडा मंडळ (17 आणि 20)
  • अमर सुभाष क्रीडा मंडळ (12 आणि 11) विजयी वि. पंचगंगा सेवा संघ ( 13 आणि 19)
  • दिलखूश मित्र मंडळ (6 आणि 1) HejeYetle वि. भवानीमाता क्रीडा मंडळ( 22 आणि 19)