शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

  • राज्यातील भीषण दुष्काळाबाबत सविस्तर चर्चा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, ७  जून २०१९ :

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळात राज्यातील जनता होरपळत असून यावर उपाययोजना करण्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, इंदापुरचे आमदार दत्ता बारणे उपस्थित होते.

  • बारामती तालुका हा दुष्काळी असून गेले दोन दिवस या दुष्काळी भागाचा दौरा करत आणि तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बारामतीसह राज्यात भीषण पाणीटंचाई व दुष्काळाचा सामना राज्यातील जनता करत आहे. या सगळ्या शेतकर्‍यांच्या समस्या आज मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. या बैठकीनंतर मिडियाशी बोलताना अजित पवार यांनी बारामतीमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत 100 जागांची पहिली बॅच ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे याबाबत बैठक पार पडली असे सांगितले. दुष्काळाचे काही मुद्दे होते ते उपस्थित केले. जनावरांच्या छावण्या बंद करू नका… हिरवा चारा येत नाही, तोपर्यंत टँकर पाणीपुरवठा कमी होत आहे. त्याबाबत सरकारने नियोजन करावे अशी मागणी करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

 

  • बारामती पाण्याच्या संदर्भात ही बातम्या आल्या, पण आमची भूमिका ही आहे की, दुष्काळात असे वाद पुढे आणू नये, पाण्याची पळवापळवी झालेली नाही, कुणीही कुणाचे पाणी पळवले नाही, सध्या कुठल्याच धरणात पाणी नाही, ऑक्टोबरमध्ये नविन सरकार येईल त्यावेळीचा हा प्रश्न आहे, कालवा सल्लागार समिती बसते त्यातून हे निर्णय होतात,जे वाटप झालंय तसे पाणी मिळणार अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी एकाचं तरी नाव सांगावं. त्याच्या सोबत कशाला आमचे आमदार जातील. याला काडीचा आधार नाही. हा दावा धादांत खोटा आहे अशी स्पष्ट भूमिका अजितदादा पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली. 

======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा