रुग्णालय उपकरणे खरेदीत गैरव्यवहार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,9 मार्च 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपकरणे खरेदी निविदा प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील उपकरणे खरेदी निविदा प्रक्रियेदरम्यान गैरव्यवहार झाला आहे का ? याबाबतचा तारांकीत प्रश्न  भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी गैरव्यवहाराची शक्यता फेटाळून लावली.

नवी मुंबईतील ऐरोली,बेलापूर व नेरुळ येथे बांधलेल्या महापालिका रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेद्वारे 3 गटांमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. या निविदांना स्पर्धात्मक दर प्राप्त होण्यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. पहिल्या गटातील निविदांना देण्यात आलेल्या दुसऱ्या मुदतवाढीनंतर महापालिकेस प्राप्त झालेल्या निविदांस अनुसरून महापालिकेकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या गटाकरीता फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचे महापालिका आयुक्तांनी कळविल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.