जेएनपीटीतील भरावाचा घारापुरीला धोका नाही

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 9 मार्च 2017/AV News Bureau:

रायगड जिल्यातील जेएनपीटी  बंदरातील वाढीव भरावामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढून जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटाला कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जेएनपीटी बंदरात वाढत्या भरावाच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचा परिणाम लाटांमुळे घारापुरी बेटावरील सागरी किनारपट्टीचे बांध, संरक्षक तट उध्वस्त झाल्याचे डिसेंबर 2016 मध्ये निदर्शनास आल्याबाबत अस्लम शेख, विजय वडेट्टीवार आणि इतर सदस्यांनी तारांकीत प्रश्न विधान सभेत उपस्थित केला होता.

जेएनपीटी बंदरामार्फत टर्मिनल 4चे विकास काम करण्यात येत आहे. त्यासाठी सेंट्रल वॉटर रिसर्च सेंटर (cwprs)या संस्थेमार्फत अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार घारापुरी बेटाच्या क्षेत्रात कोणताही विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले नसल्याचे जेएनपीटीने कळविल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली आहे.

याशिवाय समुद्र किनाऱ्यावर संरक्षक भंत उभारण्याबाबत एलिफंटा गावकऱ्यांकडून प्राप्त झालेला प्रस्ताव तपासण्यात येत असल्याचे जेएनपीटीने कळविल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.