बंदरांच्या विकासासाठी तातडीने सुविधा द्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 20 मार्च 2017 /AV News Bureau:

बंदरांच्या विकासावर राज्याचा विकासाची गती मोठया प्रमाणात अवंलबून आहे. यासाठी  राज्यातील बंदरांचा विकास गतीने होणे आवश्यक आहे. बंदराच्या विकासासाठी आवश्यक असलेली भू संपादन व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, ‍ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यातील नवीन बंदर धोरणाची अंमलबजावणी आणि नवीन बंदर विकासाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

डहाणू तालुक्यातील वाढवण येथील बंदराबाबत स्थानिक नागरिक आणि मच्छिमार समाजामध्ये काही गैरसमज आहेत. त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी या नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या बंदरामुळे त्यांना होणारे फायदे समजावून सांगितले पाहिजे. त्याचबरोबर जयगड- डिगणी हा रेल्वे प्रकल्प रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. या प्रकल्पाच्या कामास गती येण्यासाठी या मार्गावरील अद्याप बाकी असलेल्या जमिनीचे भू संपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी महसुल विभागाने तातडीने कार्यवाही करावी. तसेच राज्यात बंदरांच्या कनेक्टीव्हीटी असलेल्या रस्त्यांची कामे बांधकाम विभागाने  प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.