एपीएमसी मार्केट, रेल्वे स्थानकातही कोव्हीड टेस्टींग सुरु होणार

जागतिक कोव्हीड स्थितीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22 डिसेंबर 2022:

महानगरपालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणा-या एपीएमसी मार्केट, रेल्वे स्थानक याठिकाणीही कोव्हीड चाचणी सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिली आहे.

चीनसह काही देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेत महानगरपालिकेच्या वतीने केले जाणारे दैनंदिन कोव्हीड टेस्टींग आणि लसीकरण याविषयीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.

सध्या दैनंदिन 500 हून अधिक आरटी-पीसीआर टेस्टींग व 600 हून अधिक ॲन्टीजन टेस्टीग केल्या जात असून या टेस्टींगमध्येही वाढ करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

चीनमध्ये ओ मायक्रॉनच्या ‘बीएफ 7’ या उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले असून भारतातही गुजरात व ओऱिसा राज्यातही 4 रुग्ण आढळून आलेले आहेत. मागील कोव्हीड प्रभावीत कालखंडाचा अनुभव लक्षात घेता यापुढील काळात अधिक सतर्कता राखण्याची गरज असल्याचे सांगत आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘कोव्हीडचा धोका अजूनही टळलेला नाही’ असा संदेश जनमानसात प्रसारित करण्याची गरज असल्याचे सांगितले.

यासोबतच कोव्हीड लसीकरणाकडेही विशेष लक्ष देत महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयांमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी यांनी दिले.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लवकरच कोव्हीड प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील. त्यानुसार तत्पर कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.

  • गोवर रुबेला लसीकरणाचाही आढावा
  • गोवरचा उद्रेक झालेला आहे म्हणजे 2 पेक्षा अधिक रुग्ण सापडलेले आहेत अशा 6 आऊटब्रेक क्षेत्रात सर्वेक्षण आणि लसीकऱणावर भर देण्याचे निर्देश दिले.

 

सद्यस्थितीत कोव्हीडचे अत्यल्प रुग्ण आढळून येत असले तरी कोव्हीडची जागतिक स्थिती पाहता आपण सतर्क राहण्याची गरज असून नागरिकांनी कोव्हीडचा धोका अद्याप पूर्ण टळलेला नाही हे लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे.

अभिजीत बांगर

महापालिका आयुक्त

———————————————-