पनवेलच्या महापौरपदी भाजपच्या कविता चौतमल

उपमहापौरपदी चारूशिला घरत यांचीही बिनविरोध निवड 

पनवेल,10 जुलै 2017/AV News Bureau:

पनवेलच्या महापौरपदी भाजपयुतीच्या कविता चौतमल यांची बिनविरोध निवड झालीआहे. तर उपमहापौरदी चारूशिला घरत यांची बिनविरोध निवड झालीआहे.

२४ मे २०१७ रोजी पनवेल महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. तर २६ मे रोजी निकाल जाहीर झाला होता.  भाजपायुतीचे  ७८ पैकी ५१ उमेदवार विजयी झाले. शेकाप आघाडीला 27 जागा मिळाल्या होत्या.

पनवेल महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज फडके नाट्यगृहात पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी मलिकनेर यांनी काम पहिले. यावेळी आयुक्त सुधाकर शिंदे व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

महापौर, उपमहापौरसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शेकापआघाडीकडून हेमलता गोवारी यांनी महापौरपदासाठी तर रविंद्र भगत यांनी उपमहापौरसाठी अर्ज दाखल केले होते.  मात्र शेकाप आघाडीच्या उमेवदारांनी माघार घेतल्यामुळे कविता चौतमल यांची महापौर तर चारूशिला घरत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

  • स्थायी समिती सदस्य

स्थायी समितीच्या सदस्यपदी भाजप युतीचे परेश ठाकूर,  मनोहर म्हात्रे, संतोष भोईर, नेत्रा पाटील, रामजी बेरा, अमर पाटील, गोपीनाथ भगत, कुसूम म्हात्रे, तेजस कांडपिळे, संजय भोपी, शेकाप आघाडीचे प्रितम म्हात्रे, सुरेखा मोहोकर, भारती चौधरी, गोपाळ भगत, सतीश पाटील, हरीश केणी यांची निवड करण्यात आली आहे.

  • स्वीकृत सदस्य

स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे नितीन पाटील, अनिल भगत आणि विजय चिपळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकाच्या शर्यतीत उतरलेले शेकापचे बाळाराम पाटील  यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत अपात्र ठरला  तर गुरुनाथ गायकर व प्रमोद भगत यांना स्वीकृत नगरसेवकाची लॉटरी लागली.