सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत संघर्ष करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचा निर्धार

सिंदखेडराजा,15 एप्रिल 2017/AV News Bureau:

जो पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा पुर्णपणे कोरा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच चालू ठेवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमाफीसाठी सुरु केलेल्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊंना अभिवादन करुन करण्यात आली.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आम्ही जोरदारपणे लावून धरला, परंतु सरकारने बहुमताच्या बळावर आमच्या १९  आमदारांचे निलंबन करुन विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली. त्यामुळे अखेर आम्ही कर्जमाफीचा हा लढा जनतेच्या साक्षीने लढण्याचे ठरवून सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा काढली. आज सिंदखेडा राजा येथे  जिजाऊ जन्मस्थळापासून दुसऱ्या संघर्ष यात्रेची सुरुवात करीत आहोत, असे पवार म्हणाले.

शेजारच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व काही दिवसापुर्वीच उत्तरप्रदेश सरकार हे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते मग महाराष्ट्रातील सरकार येथील शेतकऱ्यांना का कर्जमाफी देऊ शकत नाही असा सवाल करताना जर सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नसेल तर त्यांनी सत्तेतून बाजूला व्हावे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करु , परंतु आम्हाला या प्रसंगी राजकारण करायचे नाही. संर्घषयात्रा ही कोणत्याही निवडणुका समोर ठेऊन आम्ही सुरु केलेली नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देऊन त्यांना दिलासा देणे हा आमचा उद्देश आहे, असे पवार म्हणाले.

लातूर जिल्ह्यातील शीतल वायाळ या २१ वर्षीय मुलीने आपल्या लग्नाचा खर्च वडिलांना परवडणार नाही म्हणून आपली जीवनयात्रा संपवली या घटनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर रस्त्यावर उतरलेल्या जनतेने आता पुन्हा एकदा या मुलींना व राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यायला हवी.  शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडविण्यासाठी आम्ही संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलो आहोत. शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडल्याशिवाय शेतकऱ्यांच्या हिताचा विचार हे सरकार करणार नाही असे पवार म्हणाले.

 विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन भाजप-सेना सरकारवर टीकेचे आसूड ओढले. युपीच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन दाखवली मात्र आपले मुख्यमंत्री हे अजून युपी मॉडेलचाच अभ्यास करीत आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले सत्तेत सहभागी शिवसेनेचे नेते विनोदी कलाकारांच्या भूमिकेत असून त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला देखील मागे टाकल्याची टीका विखे-पाटील यांनी केली.