मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कांदाफेक आंदोलन

मुंबई,3 मे 2017/AV News Bureau:

राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर कांदा फेक आंदोलन केले. यावेळी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनकर्त्या या महिलांनी थेट सहाव्या मजल्यावर जात मुख्यमंत्री कार्यालयाच्या समोरील लॉबीत धाव घेत  अचानक कांदे फेकण्यास सुरूवात केली. अचानक झालेल्या या कांदाफेक आंदोलनाने   बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसही गोंधळून गेले. या महिलांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जात नाही. तसेच कांद्याला हमी भाव न दिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकार याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.