औषध निरिक्षकाला लाच घेताना पकडले

ठाणे, 18 एप्रिल 2017/AV News Bureau:

होलसेल औषध विक्रीच्या परवान्यासाठी 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने एका औषध निरीक्षकाला आज रंगेहाथ पकडले.  नितीन पद्माकर भांडारकर (50) असे या औषध निरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार हे औषध विक्रीचा व्यवसाय करतात. औषध निरीक्षक नितीन भांडारकर यांनी होलसेल औषध विक्री परवान्याचे काम केल्याचा मोबदला  म्हणून तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता ही बाब खरी असल्याचे आढळून आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पाचपाखाडी परिसरात सापळा रचून नितीन भांडारकर यांना 35 हजार रुपयांची स्वीकारताना रंगेहाथ पकल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांनी दिली.

नितीन भांडारकर यांच्याविरोधात भ्रष्चाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती  पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांनी दिली.