नवी मुंबईत मोबाइल चोरटे जेरबंद, तब्बल १३ लाखांचे मोबाइल जप्त

एपीएमसी पोलिसांनी मुंबई, नवी मुंबईतून तीन चोरट्यांना केली अटक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13 ऑगस्ट 2023

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर  एपीएमसी पोलिसांनी  धडक कारवाई करीत एका टोळीला  जेरबंद करीत त्यांच्याकडून तब्बल 13 लाख 67 हजार रुपये किंमतीचे 107 विविध कंपन्यांचे मोबाइल जप्त केले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोबाइल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आय़ुक्त मिलिंद भारंबे आणि सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी सर्व पोलीस ठाण्यांना धडक कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले.  त्यानुसार परिमंडळ 1 चे पोलीस आयुक्त विवेक पानसरे आणि सहा. पोलीस आयुक्त टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख यांनी तपासाला सुरुवात केली. 9 ऑगस्ट रोजी एपीएमसी भाजी मार्केट येथे नवीनकुमार श्रवण मिश्रा या फिर्यादीचा मोबाइल फोन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख आणि पोलीस निरीक्षक सुधारक ढाणे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरटे हे नवी मुंबई, मुंबई परिसरात राहणार असल्याचे कळले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून तीन आरोपींना 11 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली. अमोल पाटील, अनिकेत पाटील, विनायक मोरे अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एपीएमसी पोलिसांनी नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले तब्बल 107 मोबाइल फोन जप्त केले आहेत. जप्त केलेल्या या मोबाइलची किंमत तब्बल 13 लाख 67 हजार रुपये असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तनवीर शेख यांनी दिली.

नवी मुंबई परिसरात मोबाइल चोरून धुमाकूळ घालणाऱ्या या टोळक्याला जेरबंद करण्याची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस हवालदार १०१० कदम, पोहवा १३७२ बोराटे, पोहवा / १४०४ भगत, पोहवा / १९४४ पाटील, पोहवा / ३४०९ म्हात्रे पोहवा / १६६९ बेलदार, पोहवा / २३२६ म्हात्रे, पौना ४७७ हरड, पोना / २८८२ नलावडे, पोना / ३२८४ काळे, पोडि / १२३९० पाटोळे, पोसि / १२१४१ भिलारे, पोशि/ ३७७२ वाटकर यांनी केली आहे

दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याच्यादृष्टीने परिमंडळ 1 चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांचे मार्गदर्शनाखाली कसोशीने प्रयत्न चालू आहेत.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी चमकदार कामगिरी करणाऱ्या एपीएमसी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

========================================================

========================================================