उमेदवारी देताना प्रत्येक घटकाला प्रतिनिधीत्व देणार

आ. प्रशांत ठाकूर यांचे स्पष्टीकरण

पनवेल, 27 एप्रिल 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपाची अधिकृत उमेदवारी देताना समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधीत्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी  स्पष्ट केले.

भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार इच्छुकांमध्ये जोरदार चुरस आहे. उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. वीस प्रभागातील ७८ जागांसाठी 300 हून अधिक इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

पनवेल शहर, आसपासचा ग्रामीण भाग आणि सिडकोच्या वसाहती असा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक भाग महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाला आहे. नोकरी व्यवसायानिमित्त इथे वास्तव्य करून असलेल्या या समाज घटकांच्याही आमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत, त्यांच्याही शहराच्या विकासाबद्दल काही सूचना आहेत. ही पार्श्वभुमी लक्षात घेता उमेदवारीमध्ये स्थानिकांना प्रतिनिधीत्व देताना बाहेरून आलेल्या या समाज घटकांनाही प्रतिनिधीत्व देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितिले. “सबका साथ, सबका विकास’ ही पंतप्रधान मोदींची घोषणा हेच आमच्या उमेदवार निवडीचे प्रमुख सुत्र आहे. या भुमिकेला पनवेल मतदारही चांगला प्रतिसाद देतील , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.