देशासाठी खेळणारी भाजपची टीम निवडून द्या

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे आवाहन

पनवेल, 17 मे 2017/AV News Bureau:

भाजपने जन्म दिलेल्या पनवेल महानगरपालिकेचे संगोपनही भाजपचं करणार आहे. आयपीएलप्रमाणे बोली लागलेली भेसळ टीम सोडून देशासाठी खेळणारी भाजपची टीम निवडून द्या, असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पनवेल मध्ये केले. प्रभाग क्रमांक १९ च्या  प्रचारकार्यालयाच्या उद्घटनप्रसंगी ते बोलत होते. भाजपमध्ये दाम दंड भेद नसून सामाच्या सोबतीत राहून काम करू आणि पढील पाच वर्षांत पनवेलचा कायापालट करू,असेही ते म्हणाले.

यावेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर,जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी,प्रदेश भाजपचे सदस्य बाळासाहेब पाटील,जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील,तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,माजी सभापती अनिल भगत,प्रभाग क्रमांक १९ चे भाजप युतीचे उमेदवार युवानेते परेश ठाकूर,चंद्रकांत उर्फ राजू सोनी,मुग्धा लोंढे,दर्शना भोईर,त्याचबरोबर महेश साळुंखे,नरेंद्र गायकवाड,बिपीन मुनोत यांच्यासह भाजप युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

घरी दुःख असताना जसा वारकरी पंढरीच्या वारीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो त्याचपद्धतीने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जात पात धर्म पंत हा भेद विसरून लोकशाहीच्या विठुरायाच्या पाठीशी जनता  उभी राहिली. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उभे राहिले. तेवढ्यात विश्वासाने त्यानंतर झालेल्या विधानसभा,जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीतही हा अश्वमेध विजयाची घोडदौड करीत आहे. राज्यातील १०० ग्रामपंचायतीना तालुका मुख्यालय असूनही नगरपालिकेचा दर्जा नव्हता, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिला. पनवेल नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतलेल्या परिश्रमाचा मी साक्षीदार आहे. नव्याने जन्माला आलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या संगोपनासाठी ४५ लाख रुपयांचा निधी एमएमआरडीएकडून त्यांनी खेचून आणला आहे. त्यामुळे भाजपने जन्म दिलेल्या पनवेल महानगरपालिकेचे संगोपनही भाजपचं करणार. पनवेलने  प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने  तरुण तडफदार आमदार दिला त्याचपद्धतीने महापालिकेत भाजपचे तरुण उमेदवार निवडून द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

पनवेलपण जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणार

भाजप युतीचे सर्व उमेदवार कमळ या एकाच चिन्हावर उभे असून कुठेही कसलीही संदिग्धता नाही. कामाच्या आधारावर आणि विकासाच्या अजेंड्यावर आम्ही मते मागतोय. एकीकडे पनवेलचे पनवेलपण जपायचेय तर दुसरीकडे आधुनिकतेकडे वाटचाल करायचीय. वर्षानुवर्षे राज्यातील शहरांचे रखडलेले नियोजन आराखडे मार्गी लावण्याचे काम मुख्यमंत्रांच्या सोबतीने केलेल्या ना. डॉ. रणजित पाटील यांनी या प्रभाग क्रमांक १९ च्या कार्यलयाचे उदघाटन केल्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आमदार प्रशांत ठाकूर

  • अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उद्या मार्गदर्शन करणार

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे गुरूवारी पनवेल महापालिकेच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यांची जरी जाहीर सभा होणार नसली तरी  दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत बापट यांच्या पनवेल दौऱ्याचे नियोजन आहे. या कालावधीत ते विविध प्रभागात फिरून प्रचाराच्या आढावा घेणार आहेत.

पनवेल महापालिकेच्या प्रचारात भाजपाने चांगलीच आघाडी घेतली असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता राज्य मंत्रिमंडळातील भाजपा मंत्र्यांच्या सभा आणि रोड शोजचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या रविवारी २१ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही पनवेल महापालिका निवडणूकीच्या प्रचारात हजेरी लावणार आहेत.