शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता

शेतकऱ्यांना आजपासूनच नवीन कर्ज मिळू शकणार- पाटील

निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास 26 जुलैपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा

कर्जमाफी तसेच इतर मागण्यांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संपावर गेलेल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे राज्य सरकारने नेमते घेतले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करण्याचा तत्वतः निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाची शासनाने तातडीने अंमलबजावणी केली नाही तर येत्या 26 जुलैपासून पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीने दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात शेतकरी संघाच्या सुकाणू समितीसोबत मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या उच्चाधिकार मंत्रीगटाची बैठक पार पडली. या बैठकीला शेतकऱ्यांच्या 35 सघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत  शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती मंत्रीगटाचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आजपासूनच शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांबाबत स्वामिनाथन समितीने सुचविलेल्या मुद्द्यांवरही लवकरात लवकर विचार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने सकारात्मक धोरण स्वीकारल्यामुळे 13 जून रोजी होणारा रेलरोको मागे घेण्यात आल्याचे सुकाणू समितीचे सदस्य खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.