अपंग प्रमाणपत्रासाठी झीरो पेंडन्सी अभियान

आत्ममग्नता जाणीव जागृती कार्यशाळेस उत्फुर्त प्रतिसाद

मुंबई,  23 जून 2017/AV News Bureau:

राज्यातील दिव्यांगांना संगणकीय अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे, यासाठी राज्यात मिशन झिरो पेंडन्सी अभियान सुरू करणार आहे. तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष महाविद्यालय स्थापन करण्याचा विचार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले.

अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण सेंटर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे (यशदा) यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित‘आत्ममग्नता जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दिव्यांगांसाठी असलेला चार टक्के निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा, यासाठी तालुकास्तरापर्यंत समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पॅरा-ऑलंपिकमध्ये यशस्वी कामगिरी केलेल्या दिव्यांग खेळाडूना दिव्यांग खेळरत्न पुरस्काराने सन्मान, त्यांना राज्य शासनाच्या सेवेत थेट सामावून घेणे, पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सोयीसुविधा देणे,दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देणे, राज्यस्तरीय दिव्यांग साहित्य, कला व उद्योजकता संमेलन आयोजित करणे, विशेष शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती स्थापन करणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. आत्ममग्न विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. अशा विशेष मुलांना सांभाळण्याचे काम करणाऱ्या पालकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आत्ममग्न मुलांना सोयीसुविधा मिळण्यासाठी राज्य शासन अशा पालकांना सर्वतोपरी मदत करील. तसेच या विषयावर काम करणाऱ्या संस्था, आत्ममग्न मुलांचे पालक यांनी राज्याच्या दिव्यांग धोरणात या विषयावर सूचना कराव्यात. त्यांचा समावेश या धोरणात करण्यात येईल,असेही बडोले यांनी सांगितले.