कल्याण जिल्हा कारागृहातील स्मार्टकार्ड फोन सुविधा, सी.सी.टी.व्ही. प्रकल्पांचे उद्घाटन

प्रतिकात्मक फोटो
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे,  13 मार्च 2024

कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे- 1 चे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते 12 मार्च रोजी कल्याण जिल्हा कारागृह येथे ई-मुलाखत, ई-ग्रंथालय, स्मार्टकार्ड फोन सुविधा व कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा सी.सी.टी.व्ही. प्रकल्पांचा उद्घाटन करण्यात आले. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण विभाग, भायखळा, मुंबई-४ चे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई व कल्याण जिल्हा कारागृह अधीक्षक आर.आर.भोसले आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


जलद गतीने बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर वाढत चाललेले आधुनिकीकरणाची बाब कारागृह प्रशासनाने देखील आत्मसात करुन कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे- 1 चे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता व कारागृहाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृह सुरक्षिततेबरोबर कारागृहाचे आधुनिकीकरण करुन कारागृहात विविध नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत, अशी माहिती कल्याण जिल्हा कारागृह अधीक्षक आर.आर.भोसले यांनी दिली आहे.


बंद्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या ई-ग्रंथालय सुविधेसाठी 5 नवीन संगणकांवर ई-ग्रंथालयाच्या विविध वेबसाईट सुरु करुन त्यामध्ये 3 ते 4 हजार पुस्तके ऑनलाईनरीत्या बंद्यांच्या वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बंद्यांच्या ई-मुलाखतसाठी उच्च प्रतीचे 05 नवीन संगणक वेब कॅमेरा व हेडफोन सह कार्यान्वित करण्यात आले असून ई-मुलाखत प्रक्रियेद्वारे बंद्यांच्या नातेवाईकांना घरबसल्या तसेच देशभरातून कोणत्याही ठिकाणाहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारागृहात दाखल बंद्याची मुलाखत घेणे शक्य होणार आहे.

स्मार्टकार्ड फोन सुविधेसाठी कारागृहात सर्व सर्कल व विभागांमध्ये 16 स्मार्टकार्ड फोन बसविण्यात आले असून त्याद्वारे प्रत्येक आठवड्यातून तीन वेळा (एकूण 18 मिनिटे) बंद्यांना आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधता येणार आहे. कारागृह सुरक्षेसाठी आर्टीफिशियल इंटेलिजेंस सारखे उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेले 270 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे देखील कारागृहात बसविण्यात आलेले आहेत.

========================================================


========================================================

========================================================