क्रिकेट’कोच’साठी सेहवाग,शास्त्रीमध्ये स्पर्धा

मुंबई, 10 जुलै 2017/AV News Bureau:

भारतीय क्रिकेट संघाच्या कोचची निवड कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतरच करण्यात येणार आहे. ‘कोच’ साठी भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. शास्त्रीच्या नावाला कोहलीचा पाठिंबा आहे तर बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा सदस्य आणि माजी कर्णधार सौरव गांगुली शास्त्रीची निवड करण्यास फारसा उत्साहीत नसल्याचे समजते. मात्र कोहलीशी चर्चा करूनच नव्या कोचची निवड होणार असल्याचे गांगुलीनेच स्पष्ट केल्यामुळे शास्त्रीचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.

भारताचा माजी विश्वविक्रमी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी कोहलीशी मतभेद झाल्यानंतर सरळ  कोच पदाचा राजिनामा दिला होता. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघाने भरीव कामगिरी केली होती. यामुळे कोहलीवरही टीका झाली होती. मात्र कुंबळेने कोचपदाचा राजिनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी नव्याने शोधाशोध सुरू झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या कोचपदासाठी माजी कसोटीपटू रवी शास्त्री, तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग,लांस क्लूजनर,राकेश शर्मा, लालचंद राजपूत. फिल सिमंस,टॉम मूडी,डोडा गणेश,रिचर्ड पाइब्ज,उपेंद्रनाथ ब्रह्मचारी आदींची नावे  आली आहेत. मात्र त्यापैकी सहा जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांनी सेहवाग, लालचंद राजपुत, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, फिल सिमंस, रवी शास्त्री यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीच्या सत्रानंतर सौरव गांगुलीने स्पष्ट केले की, अद्याप कोचपदाचा निर्णय झालेला नाही. कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्याच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.

सध्या रवी शास्री आणि स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचे नाव कोचपदासाठी आघाडीवर आहे. विराट कोहली आक्रमक खेळ करण्यास प्रसिद्ध आहे. तर विरेंद्र सेहवागही स्फोटक फलंदाजीसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र बीसीसीआयची सल्लागार समिती दोघांपैकी कोणाला पसंती देणार किंवा तिसरेच नाव पुढे येणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.