शिक्षकांच्या भरतीसाठी आता परीक्षा

मुंबई, 30 मे 2017/AV News Bureau:

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याआधी शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षकांची भरती  परिक्षा घेवून मेरिटनुसारच करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरतीत लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षण संस्थांना मोठा  दणका बसणार आहे. तसेच गुणवत्ताधारक शिक्षकही विद्यार्थ्यांना लाभतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.हा  निर्णय स्वयंअर्थसहाय्य असणाऱ्या व खासगी विनाअनुदानित शाळांना लागू राहणार नाही. तसेचयापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षाही (CET) रद्द करण्यात आली आहे.

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना परिक्षा द्यावी लागणार आहे. 200 गुणांच्या या परिक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असणार आहे. इयत्ता पहिली ते आठवी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, 1981 मधील शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच “शिक्षक पात्रता परीक्षा” (TET)  उत्तीर्ण उमेदवार परीक्षेस अर्ज करण्यास पात्र ठरतील. या चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करावी लागणार आहे.