सौदीत  आगीत 10 भारतीयांचा मृत्यू

  • प्रातिनिधिक फोटो

 

सौदी अरेबिया, 13 जुलै 2017

सौदी अरेबियामध्ये एका घराला लागलेल्या आगीत होरपळून 10 भारतीय नागरीकांना मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत काही व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना बुधवारी येथील नजरान भागात घडली आहे.

जेद्दाहपासून 900 कि. मी. अंतरावर असणाऱ्या नजरान भागात एका घरात काही भारतीय कामगार वास्तव्याला होते. बुधवारी घराला लागलेल्या आगीत 11 जण मरण पावले तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मरण पावलेल्यांमध्ये 4 जण उत्तर प्रदेशचे  असून 3 केरळ आणि बिहार, तामिळनाडूमधील एकाचा समावेश आहे. तर अन्य दोघांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी 5 जण भारतीय नागरिक आहेत. तर एक बांगलादेशचा नागरिक असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हे सर्व बांधकाम मजूर असल्याचे कळते.

या दुर्घटनेतील मृतांपैकी एकाच्या पत्नीने पतीचा मृतदेह भारतात आणण्याची विनंती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला केल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी सौदीमधील आपल्या दुतावासाशी संपर्क साधून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीटरवरून याची माहिती दिली आहे. दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तातडीने मदत देण्याविषयी सौदीमधील भारतीय दुतावासाला सांगण्यात आले आहे. तसेच भारतीय अधिकारीही नजरानला रवाना झाल्याचे स्वराज यांनी सांगितले.