पाऊस गायब, शेतकरी धास्तावला

मुंबई, 13 जुलै 2017/AV News Bureau:

राज्यातील शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. यंदा वेळेवर हजेरी लावल्यानंतर पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतीसाठी लगबग करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून येत्या दोन तीन दिवसांत पाऊस सक्रीय झाला नाही तर राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. जून महिन्यात सुरूवातीपासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने शेतीची कामे सुरू केली आणि जवळपास 40 टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणीदेखील केली आहे. मात्र जुलै महिना उजाडला असून पावसाने दडी मारली आहे. गेले काही दिवस राज्यातील अनेक भाग कोरडे झाले आहेत. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रीय न झाल्यास आतापर्यंत झालेली शेतीची कामे फुकट जाण्याची शक्यता असून शेतकरी धास्तावला आहे

दरम्यान, येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडला नाही तर सुमारे 15 टक्के क्षेत्रात नव्याने पेरणी करावी लागण्याची शक्यता कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

दुबार पेरणी करावी लागल्यास सरकारकडून बियाणांची व्यवस्था करण्यात आली असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यिंनी पेरणी झालेल्या भागात पंचनामे करण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.