रत्नागिरी-दादर पॅसेंजर दादरपर्यंत चालवा

निरंजन डावखरे यांची मागणी

ठाणे, 13 जुलै 2017/AV News Bureau:

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत असून प्रवाशांच्या सोयीसाठी ही पॅसेंजर गाडी पुन्हा दादरपर्यंत चालविण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

दादर ते रत्नागिरीदरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीला कोकणातील चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. मात्र गेल्या काही काळापासून ही गाडी दादर स्थानकाऐवजी मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकातून सुटते. तसेच परतीच्या प्रवासातदेखील या गाडीला दादरऐवजी दिवा स्थानकातच शेवटचा थांबा देण्यात येतो. त्यामुळे पुढील प्रवासासाठी चाकरमान्यांना आपल्या मुलाबाळांसह तसेच सामानासह लोकलच्या गर्दीतून नव्याने प्रवास करावा लागतो. आधीच लांब पल्ल्याचा प्रवास करून थकलेल्या चाकरमान्यांना पुन्हा दिवा येथून पुढील प्रवासासाठी सामानासह पुन्हा लोकल पकडावी लागत असल्यामुळे लहान मुले, महिला आणि वृद्ध व्यक्तींना त्याचा त्रास होतो. शिवाय वेळेचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेवून रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकाऐवजी पुन्हा दादरपर्यंत चालवावी, अशी मागणी डावखरे यांनी  रेल्वे मंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.