कोकण रेल्वे मार्गावर सतर्कता

नियमीत गस्ती सुरू

नवी मुंबई, 10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वेरुळांवर अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न उघडकीस आले आहे. यापार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरही सतर्कता बाळगण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर रोह्यापासून पुढे नियमित मानवी गस्ती सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर अडथळे निर्माण करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामागे घातपाताची शक्यता आहे का, याबाबत सखोल तपास सुरू आहे. सततच्या उघड होणाऱ्या या घटनांमुळे कोकण रेल्वे मार्गावरही सतर्कता बाळगण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे पोलीस बल तसेच कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून नियमित तपासणी करण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली.

कोकण रेल्वे मार्ग हा कोकणातील घनदाट जंगलातून जातो. तसेच या रेल्वे मार्गावर असंख्य बोगदे आहेत. यापार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर 24 तास रेल्वे कर्मचाऱ्यांची गस्त सुरू आहे. शिवाय लोको पायलट च्या सहाय्याने रेल्वे मार्गाची तपासणीही करण्यात येते, अशी माहिती माहिती कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी दिली.