दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना विकासकामांची यादी दाखवा

आ. नरेंद्र मेहता यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

मीरा भाईंदर, 3 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

मेट्रो ७ चा मीरा भाईंदरपर्यंत विस्तार, सुर्या विभागीय पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहराला २१.८ कोटी लिटरचा पाणीपुरवठा सुरू करण्यात मिळालेले यश,नव्या नळ जोडणीची सुरू झालेली मंजुरी प्रक्रिया, वसई पुलाच्या चौपदरीकरणाचे सुरू झालेले काम, त्यामुळे सुटलेला वाहतुक कोंडीचा प्रश्न, अशी गेल्या तीन वर्षांतील विकास कामांची यादी नजरेसमोर असतानाही, जे विरोधक मीरा भाईंदरमध्ये बदल हवा असा दिशाभूल करणारा प्रचार करतात, त्यांना या कामांची आठवण करून द्या, असे आवाहन आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.

मुंबईच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विकासाच्या या प्रक्रियेत मीरा भाईंदर या शहराचाही समावेश असावा आणि या शहराचा जलदगतीने विकास व्हावा यासाठी भाजपचे स्थानिक नेतृत्व प्रयत्न करीत आहेत. नवी मुंबई, पनवेल, वसई विरार, आणि मीरा भाईंदर या शहरातील विविध प्रकल्पांना केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारने चालना दिलेली आहे. यामुळे आगामी 10-12 वर्षांत मीरा भाईंदर शहराचा चेहरा मोहराच बदलून जाणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.

भाजपाने सध्या देशात आणि राज्यात विकास आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांच्या आधारे अवलंबलेल्या कार्यपद्धतीचे मीरा भाईंदरमधील मतदारांनाही आकर्षण आहे. फक्त आकर्षणच नव्हे तर मीरा भाईंदर महापालिकेचा कारभारही त्याच पद्धतीने व्हावा,अशी अपेक्षा मीरा भाईंदरची जनता  व्यक्त करत आहे. मात्र असे असताना विरोधक विरोधक त्याकडे दुर्लक्ष करून बदलाची भाषा करत असतील, तर मतदार त्यांना योग्य तो धडा शिकवतील, अशी भावना मेहता यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.

शहरातील पाण्याच्या प्रश्न सोडवण्यात आपल्याला बऱ्यापैकी यश आले आहे, आता पनर्विकासाचा मुद्दाही मार्गी लावण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र, राज्य आणि मीरा भाईंदर शहरात झालेली कामे योग्यरित्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.