निसर्ग समजून घ्यावाच लागेल

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 26  मार्च 2024 

मार्च महिना सुरू झाला की यंदाचा पाऊस आणि उन्हाळा याची चर्चा सुरू होते. भारतीय हवामान विभाग यासाठी सातत्याने नवीन प्रणालीच्या माध्यामातून अचूक भाकित करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी उपग्रह आणि काही निरीक्षणांची मदत घेतली जाते. दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्याच्या आसपास उष्णतेचा अंदाज वर्तविण्यात येत असतो. मागील दोन तीन वर्षांपासून यंदाचा उन्हाळा किती कडक असेल याबाबत सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो.

कारण गेल्या काही वर्षांत दरवर्षी यंदाचा उन्हाळा जास्तच असणार याची सवय आता सर्वांना लागली आहे.  मात्र जास्त म्हणजे तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जाण्यापर्यंत आता उन्हाळा कडक झाला आहे. याची सुरूवात मार्च महिन्यापासूनच होते. या महिन्यात उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते. भारत शेतीप्रधान देश असल्याने प्रत्येक सण शेती, हवामान,ऋतू चक्रावर आधारित आहेत. त्यामुळेच मार्च महिन्यात जाणवणारा उन्हाळा कमी करण्यासाठी आणि या बदलांना सामोरे जाण्यासाठी होळी, रंगपंचमी सारखे सण साजरे केले जातात.

होळीनंतरची दाहकता कमी करण्यासाठी आहारातही बदल सांगितला आहे. मात्र आता तापमान वेगाने वाढत आहे. हे बदल आ़णि या पध्दती या वाढत्या तापमानात आपल्याला तरतील अशी अपेक्षा करूयात. कारण निसर्ग बदलोत. अर्थातच त्या बदलाला माणूसच कारणीभूत आहे. ग्लोबल वॉर्मिग आता ग्लोबल वॉर्निंग च्या रुपाने समोर आले आहे.

झाडांची कत्तल, जमिनीचे वाळवंटीकरण, कॉंक्रीटच्या इमारती, अमाप भूजल उपसा हे सर्व आपणच केले आहे. आपण केलेल्या चुकांची भरपाई निसर्गाने त्याच्या परीने करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तो कमीच पडला आहे म्हणूनच आपल्याला क्लायमेट चेंज वातावरणीय बदलाला समोरे जावे लागत आहे.

वाढणारा पारा हा त्याचे एक रूप आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत मर्यादित असणारा पाऊस आता जवळपास वर्षभर मुक्कामी असल्यासारखाच असतो. त्यामुळे अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होते. ही यादी काही संपणार नाही. पण यामध्ये आता बदल करायचा असेल तर अजूनही वेळ आहे हे इतरांना सांगण्यापेक्षा आपल्या घरातूनच याची सुरूवात केली पाहिजे तरच पर्यावरणाचे रक्षण होईल आणि हळूहळू का होईना बदल होईल. यासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोड्या पाण्याचे संवर्धन होण्याची गरज आहे.

पाणी संवर्धन ही सर्वात मोठी आवश्यकता बनणार आहे. त्यासाठी विहिरी, कूपनलिका याचं पुर्नभरण होणे गरजेचे आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग मुळे वर्षभरासाठीचा पाणी साठा मिळणार आहे. जमिनीची धूप थांबावी यासाठी झाडे लावली पाहिजेत. मात्र त्यामध्ये भारतीय हवामानात तग धरतील अशा पारंपरिक झाडांचा समावेश होणे आवश्यक आहे. प्लास्टिकचा प्रश्न तर कायमच आहे. शेवटी निसर्ग जपायचा असेल तर आधी निसर्ग समजून घ्यावा लागेल त्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल.

पूर्वीची जुनी जाणती माणसे घराच्या अंगणात पडणा-या सावलीवरून अचूक वेळ सांगायची. आपले पंचांग आणि गणित यामध्ये या मेळ होताच. आता कॉम्प्युटरच्या जोडीला ए आय तंत्रज्ञान आले आहे. तंत्रज्ञान कितीही मोठे असले तरी त्याचा पाया हा गणितावरच आहे. आणि गणिताची सुरूवात शून्यापासून होते. निसर्गाचा समतोल सांभाळून प्रगती करायची असेल तर आता पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागेल.

निसर्ग हा खूप मोठा शिक्षक मानला जातो कारण त्याने प्रत्येकाला केव्हा, कधी, काय करायचे आहे याचे व्यवस्थित शिक्षण दिले आहे. वर्षभर कधीही न दिसणारे रातकिडे केवळ पावसाळ्याआधीच चमकतात, जमिनीतून वर येणारा लाल किडा केवळ त्या आठ दिवसांतच दिसतो, तारे आपली दिशा बदलत नाहीत, मग सगळे आपआपले नियम पाळत असताना आपणच नियमांचे पालन का करत नाही हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. त्यासाठी काय करायचे याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.

एक सुरूवात नवीन आशा घेवून येईल. निसर्गातलाच वसंत ऋतू नवनिर्मितीची प्रेरणा देतो. निसर्गातली ही नवीन पालवी यानिमित्ताने एका नवीन मार्गाकडे नेण्यासाठी मदत करेल.

========================================================


===================================================================