महापालिकेच्या शाळेला स्वच्छतेचा पुरस्कार

महाराष्ट्रातील 15 शाळांचा पुरस्कार यादीत समावेश

नवी मुंबई, 22 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशातून “स्वच्छ भारत – स्वच्छ विदयालय” या उपक्रमांतर्गत “स्वच्छ विदयालय पुरस्कार” सन 2016-17 साठी ठाणे जिल्ह्यातून नवी मुंबई महापालिकेची शाळा क्रमांक 104 राजश्री छत्रपती शाहु महाराज विद्यालयाची निवड करण्यात आली आहे.  या पुरस्कारासाठी देशभरातून 172 शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 15 शाळांचा समावेश आहे. हा पुरस्कार जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर देण्यांत येत असून जिल्हा स्तरावरील पुरस्कार नवी मुंबईतील शाळेला मिळाला आहे.

हा पुरस्कार 1 सप्टेंबर, 2017 सकाळी 10 वाजता, केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे हस्ते दिल्ली येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येत आहे. या पुरस्कार सोहळयास शाळेच्या वतीने शिक्षक मारुती गवळी व विदयार्थी सुरज झा हे उपस्थित राहणार आहेत. “स्वच्छ विदयालय पुरस्कार” प्राप्त शाळांना पन्नास हजार रूपये इतके अतिरिक्त शाळा अनुदान मिळणार आहे. या अनुदानाचा उपयोग शाळेतील स्वच्छतेच्या कामासाठी वापरला जाणार आहे.