ग्रामपंचायत निवडणूक मतदानाची तारीख बदला

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबई, 4 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दुसऱ्या टप्प्यात 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मात्र 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने मतदानाची तारीख बदलावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

4 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने नागपूर दीक्षाभूमी आणि दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. परंतु, याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान जाहीर केल्याने मतदानाच्या टक्केवारीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची 14 ऑक्टोबर ही तारीख बदलून दुसरी तारीख जाहीर करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.