कर्जमाफीची रक्कम १ ऑक्टोबरपर्यंत न दिल्यास आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा इशारा

मुंबई, 4 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख ऑनलाईन अर्ज आले आहेत. आलेल्या अर्जांपैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत त्यांची संख्या सरकारने येत्या १ ऑक्टोबरच्या आत जाहीर करावी. तसेच सरकारने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १ ऑक्टोबर पूर्वी पैसे जमा करावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना दिला.यावेळी पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते.

राज्य सरकार पूर्णतः सत्तेत मशगूल झाले आहे. सरकारचे ना मुंबईकडे लक्ष आहे, ना अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडे, ना राज्यातील गणेश भक्तांकडे… या सरकारने घोषणा तर भरसाठ केल्या, मात्र कृतीमध्ये कोणतीच गोष्ट आणली नाही. मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती केली जाईल अशी माहिती कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र अद्याप या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. सरकारने गणेशभक्तांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे असा आरोप तटकरे यांनी केला.

मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मुंबई महानगरपालिका आपली कामगिरी बजावण्यात पूर्णपणे फोल ठरली आहे. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. अमरापूरकर यांना आपला जीव गमवावा लागला. राज्य सरकारने याप्रकाराची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणीही त्यांनी केली.