रस्त्यांवरील खड्डे डिसेंबरपर्यंत बुजवा

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

मुंबई8 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतंर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व अभियंत्यांनी तातडीने खड्डे बुजविण्याचो काम सुरु करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.

खड्डेमुक्त रस्ते करण्यासंदर्भात पाटील यांनी राज्यातील सर्व मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

खड्डे बुजविण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करून 25 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करावे, अशा सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. खड्डे भरण्यासाठीच्या निविदांना जर योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतः हे खड्डे बुजविणार आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य/सामुग्री खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जुन्या निविदांसंदर्भात व्हॅट व जीएसटीमधील फरकासंदर्भातील प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. कंत्राटदारांना या फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी जेट पॅचर तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.