सिडकोंतर्गत पुनर्विकासाबाबत आढावा बैठक

दोनही महापालिका क्षेत्रातील भुखंड पुनर्विकासाबाबत  कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, 13 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई व पनवेल महापालिकांतर्गत येणाऱ्या सिडकोशी तसेच महसूल, नगरविकास विभागाशी निगडीत बाबींवर वेगाने कार्यवाही  करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत दिले. सिडको अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्रातील भुखंड पुनर्विकास तसेच विविध विकास कामांबाबत विधानभवन समिती कक्षात ही आढावा बैठक घेण्यात आली होती.

बैठकीत दोन्ही महापालिका अंतर्गत येणाऱ्या सिडकोच्या विविध स्वरूपाच्या भुखंडाचे भाडेपट्टे करार नुतनीकरण, डंम्पींग ग्राऊंड भुखंडासाठीची कर भरणा यांसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. भुखंडांच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासह अन्य विकास कामांचा यावेळी आढावाही यावेळी घेण्यात आला. या सर्व कामांबाबत संबंधित यंत्रणांनी वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीला  सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकूमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ रामास्वामी एन., पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.