10 हजार रूपये उचल योजनेचा बोजवारा उडाला

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांची टीका

मुंबई, 12 सप्टेंबर 2017/AV News Bureau: 

सरकारने फार मोठा गाजावाजा करून शेतक-यांसाठी जाहीर केलेल्या 10 हजार रूपये उचल योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. या अपयशातून सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

  • 11 जून 2017 रोजी राज्य शासनाने शेतक-यांकरिता 10 हजार उचल योजना जाहीर केली होती. या योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2017 होती. राज्यामध्ये एकूण 1 कोटी 36 लाख खातेदार शेतकरी आहेत.  या योजनेच्या अंतिम तारीख 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील केवळ 52 हजार 961 शेतक-यांना 10 हजार रूपयांची उचल देण्यात आली आहे.  या योजने अंतर्गत केवळ 52 कोटी 77 लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर 10 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांचे अर्ज फेटाळण्यात आले.  सुमारे 24 दिवस सरकारने बँकांना हमी दिली नाही. त्यामुळे ही  योजना फसल्याने लाखो शेतक-यांना सरकारने आपली जबाबदारी टाळून जाणिवपूर्वक सावकारी विळख्यात ढकलल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

राज्यातील शेतक-यांनी ऑनलाईन फॉर्म भरला नाही म्हणून 10 लाख शेतक-यांची खाती बनावट आहेत, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याचेही सावंत यांनी सांगितले. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता बायोमेट्रीक, मोबाईलवर ओटीपी, आधारकार्ड अशा अनेक अटी व शर्ती या सरकारने टाकल्या आहेत, यातून शेतक-यांनी फॉर्म भरू नये याची पूरेपूर काळजी सरकारने घेतली आहे. असे असताना जे गरीब शेतकरी फॉर्म भरू शकले नाहीत, त्यांच्या खात्यांची बँकांकडे कुठलीही तपासणी न करता ती खातीच बनावट आहेत असे म्हणणे हा शेतक-यांचा अपमान असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी कोणत्या चौकशीतून खाती बनावट असल्याचा निष्कर्ष काढला आणि बनावट खाती उघडणा-या बँक अधिका-यांवर काय कारवाई करणार ? हे स्पष्ट करावे अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.