‘शहरांमध्ये परिवर्तनासाठी भाजपाला साथ द्या’

मुंबई,23 नोव्हेंबर 2016 /AV News Bureau :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलत आहे. आपले राज्य सरकार महाराष्ट्र बदलत आहे. देश आणि राज्याप्रमाणे विकासाची गंगा आपल्या शहरात येण्यासाठी त्याच विचारांकडे नगरपालिकांची सत्ता द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (22 नोव्हेंबर रोजी ) सांगली जिल्ह्यात तासगाव येथे केले.

तासगाव नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजय सावंत आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. संजयकाका पाटील, पक्षाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, विलास जगताप आणि सुरेश खाडे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडसी निर्णय घेऊन काळ्या पैशाच्या विरोधात निर्णायक लढाई सुरू केली आहे. जनतेला थोडा त्रास सहन करावा लागत आहे. पण पन्नास दिवस त्रास सहन केला तर आगामी पन्नास वर्षे देश आघाडीवर राहील. देश बदलण्याचे काम मोदी यांनी सुरू केले आहे. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे झाली तरी सर्वांना घर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की, २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्के घर मिळाले पाहिजे. आपण राज्यात २०१९ पर्यंतच सर्वांना घरे मिळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरात आपला नगराध्यक्ष निवडून येईल व आपले नगरसेवकही निवडून येतील. त्यांनी निवडून आल्यावर गरिबांना घरे यासाठी प्रयत्न करावा. आपण जेवढी घरे मंजूर कराल तेवढ्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून पैसे येतील. प्रत्येक गरिबाला घर हे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या राज्यात निम्मे लोक शहरांमध्ये राहतात. दुर्दैवाने यापूर्वीच्या सरकारने शहरीकरण शाप समजले. त्यामुळे नियोजनाअभावी शहरे भकास झाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरीकरण ही संधी मानले आहे. शहरांमध्ये सुविधा निर्माण होतील व रोजगार निर्माण होईल यासाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्य सरकारने राज्यातील शहरांमध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता व सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी विशेष पुढाकार घेतला आहे,असेही त्यांनी सांगितले.