नवी मुंबई महापालिकेलाही सीबीएसई बोर्डाचे वेध

नवी मुंबई,19 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

नवी मुंबई शहरात महापालिकेतर्फे सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर  आधारीत शाळा सुरू करण्याची तयारी चालविली आहे. महापालिका शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेतर्फे सध्या सुरु असलेल्या शाळा या स्टेट बोर्डाच्या अखत्यारित येतात. मात्र महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनासाठी सीबीएसईच्या शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी पालक आणि विद्यार्थीवर्गाकडून केली जात असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.त्यामुळे सीबीएसई शाळा सुरू  करण्याबाबत नवी मुंबई महापालिका सभागृहानेही बैठकीत इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापौरांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाला  सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून शिक्षण विभागाने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात परिमंडळनिहाय प्रत्येकी एक सीबीएसई  बोर्डाची शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.