आणखी एक रेल्वे दुर्घटना टळली

railway electric pole

पनवेल- जेएनपीटी  रेल्वे मार्गावर इलेक्ट्रीक पोल आढळला

 मालगाडी मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

नवी मुंबई, 8 फेब्रुवारी 2017 AV News Breau:

पनवेल- जेएनपीटी रेल्वे मार्गावरील कोपरा गाव गव्हाण फाटा येथे रेल्वे रूळाला लागूनच सात फूट लांबीचा विद्युत खांब ठेवल्याचे बुधवारी पहाटे आढळून आले. मात्र मालगाडीच्या मोटरमनला हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालदेखील कळंबोली येथील नेवाडे फाटा परिसरात रेल्वे रूळांदरम्यान लोखंडी तुकडा ठेवल्याचे आढळून आले होते. त्यामुळे वारंवार असे प्रकार उघडकीस येत असल्यामुळे रेल्वे मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पनवेल शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेल- जेएनपीटी रेल्वे मार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास मालगाडी जात होती. त्यावेळी मालगाडीच्या मोटरमनला रेल्वे मार्गाला अगदी लागूनच  7-8 फूट लांबीचा विद्युत खांब पडलेला आढळून आला. साधारणपणे 100 ते 150 किलो वजनाचा पोल रुळाला अगदी खेटून आढळून आल्यामुळे मोटरमनने लगेचच गाडी थांबविली आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत खांब रेल्वे मार्गावरून बाजूला केला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 336 कलमानुसार आणि रेल्वे अक्ट 150 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील बाजारे यांनी दिली.

दरम्यान, कालच कळंबोली परिरात नेवाडे फाटा येथे अशाचप्रकारे रेल्वे रुळावर लोखंडी तुकडा टाकल्याचे आढळून आले होते. त्यावेळी पुणे –सात्रांगाची एक्सप्रेसचे मोटरमन पाटील यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली होती. तसेच कही दिवसांपूर्वी जनशताब्दी एक्सप्रेसच्या मार्गावरही अशाचप्रकारे लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे रेल्वे मार्गांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.