भांडुप परिमंडळात काम करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ श्रावणी शेलार यांचे देशपातळीवर सन्मान

केंद्र सरकारच्या  ‘लाइनमेन दिवस २०२४’  कार्यक्रमात उत्कृष्ट लाईनमन म्हणून गौरव
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 7  मार्च 2024

पूर्वी भारतात एक काळ असा होता की जिथे स्त्रियांना घराच्या चार भिंती मध्ये कोंडून राहावे लागत असे. स्त्रियांना ना शिक्षणाचा अधिकार होता, ना बोलण्याचा. पण आज महिलांनी शिक्षण, कला, विज्ञान,  राजकारण यासारख्या अनेक क्षेत्रात प्रवेश केला आहे व त्या कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे दाखवून दिले आहेत. आज आपण पाहतो की भारतीय महिलांचे समाजात वेगाने प्रबोधन होत आहे. भारतीय महिलांनी अल्पावधीतच हे सिद्ध केले आहे की भारतातील महिला शिक्षण, बुद्धिमत्ता, सौंदर्य आणि शौर्यामध्ये जगातील कोणत्याही देशातील महिला पेक्षा कमी नाहीत. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे श्रावणी शेलारची.


बातमी वाचा : विचारांच्या स्वातंत्र्याला संस्कारांची जोड असावी- अति.आयुक्त सुजाता ढोले

श्रावणी शेलार पॉवर सेक्टर सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात कार्यरत आहेत. भांडुप परिमंडळातील ठाणे नागरी मंडळात, ठाणे-१ विभागातील किसन नगर उपविभाग येथे त्या वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.  त्या त्यांच्या  कामात कोणत्याही पुरुष सहकाऱ्यापेक्षा कमी नाहीत. वीज बिल वसुली असो , विजे संबंधित तक्रारींचे निवारण करणे असो , वीज मीटर तपासणी असो किंव  वीजचोरी पकडण्या सारखी धोकादायक कामे असो. त्या एकदम चोखपणे करतात. विशेष म्हणजे त्यांनी कधीही कोणत्याही कामाला नाही म्हंटले नाही व मागच्या एका  वर्षात त्यांनी सेक्शन व्यतिरिक्त ९-१० मोठ्या वीजचोऱ्या स्वतः पकडून दिले आहेत.  याशिवाय, किसननगर येथे  रोहित्र बिगाडाची तक्रार सुद्धा शून्य करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

श्रावणी शेलार यांचा जन्म रत्नागिरी येथील चिपळूण गावात झाला. त्यांचे वडील सुताराचे काम करतात. त्यांनी श्रावणीला चिपळूण येथे आय.टी.आय चे शिक्षण दिले  व  श्रावणी शेलार यांनी अप्रेंटीस नंतर २०१३ च्या भरती प्रक्रिया उत्तीर्ण करून महावितरण येथील कणकवली शाखेत तंत्रज्ञ म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर, त्यांची बदली चिपळूण येथे झाली. तिथेही त्यांनी चांगले काम केले व २०२० मध्ये  शेलार यांची बदली भांडूप परिमंडलातील किसननगर शाखेत झाली.

२०२० पासून त्यांनी चांगली कामगिरी केली असून  केंद्रीय विद्युत प्राधिकरण तर्फे आयोजित ‘लाइनमेन दिवस २०२४’  दिनांक ४ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यातील महावितरण कंपनीतील प्रादेशिक कार्यालय कोकण विभागामधील इंडियन पॉवर सेक्टर मध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट लाईनमन म्हणून इंडिया हॅबिटेट सेंटर दिल्ली येथे प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.

या त्यांच्या यशाबद्दल मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनील काकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले व ठाणे मंडलात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात  त्यांचा सत्कार केला. यावेळी, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम व ठाणे-१ विभागाचे कार्यकारी अभियंता  चंद्रमणी मेश्राम प्रामुख्याने उपास्थित होते.

========================================================


========================================================